सोलापूर : सोलापूर शहरात सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एसटीवर दगडफेक करून नुकसान केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने न्यू बुधवार पेठ रमाबाई आंबेडकर नगर येथून एका तरुणाला बुधवारी अटक केली. तर त्याचा साथीदार अद्याप फरार आहे. अटक केलेल्या आरोपीस दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.
दरम्यान, यात जितेश शरण बसप्पा महिंद्रकर (वय ३२, रा. रमाबाई आंबेडकर नगर, न्यू बुधवार पेठ सोलापूर) याला बुधवारी अटक केली. तर त्याचा दुसरा साथीदार मोहसिन मैंदर्गिकर सध्या फरार असून त्याचाही शोध पोलिसांकडून सुरू असल्याचे सांगण्यात आले.
यात मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी कैलास आनंदराव हेंडगे (वय 38, व्यवसाय एस. टी. चालक रा. गौळ, ता. कंदार, जि. नांदेड) हे परिवहन मंडळाची बस वाहन (क्रमांक एमएच 14 बीटी 4952) ही स्वतः चालवत होते. प्रभाकर महाराज चौक येथून ही बस जाताना तीन अज्ञात अनोळखी व्यक्तींनी बसवर दगडफेक केली. यात बसचे नुकसान झाले. या घटनेतील साक्षीदार बालाजी दत्तात्रय गंगणे हे परिवहन मंडळाची चालवीत असलेली बस वाहन (क्रमांक एम एच 05 ईएम 1382) या बसवरही तीन अज्ञात अनोळखी व्यक्तींनी दगडफेक केली. यामध्ये शासकीय मालमत्तेचे नुकसान झाल्याने अज्ञात व्यक्तीविरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींवर दाखल करण्यात आलेल्या कलमांमध्ये पोलिसांनी वाढ केली आहे. अटकेतील आरोपीस पोलिसांनी सोलापूर सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक खंडागळे करीत आहेत.