कणकवली : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियान सिंधुदुर्गात राबविण्यात आले होते. या अभियानात संयुक्त ग्रामपंचायत 2023 म्हणून जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायती घोषित करण्यात आल्या आहेत. या ग्रामपंचायतींचा गौरव गुरुवार, दि.12 डिसेंबर रोजी होणार आहे. सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात सकाळी 10.30 वा. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या कार्यक्रमात टीबीमुक्त ग्रा.पं.चा गौरव होणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग व जिल्हा क्षयरोग नियंत्रण सोसायटी सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून 2023 मध्ये हे अभियान सिंधुदुर्गात राबविण्यात आले होते. त्यामधून सिंधुदुर्गातील 70 ग्रा.पं. टीबीमुक्त म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये देवगड तालुक्यातील बुरंबावडे, कातवण, पावणाई, वानिवडे, कुडाळ तालुक्यातील आवळेगाव, गिरगाव-कुसगाव, हिर्लोक, माड्याचीवाडी, पणदूर, पोखरण-कुसबे, वाडीवरवडे, दोडामार्ग तालुक्यातील कोलझर, कुडासे, तळकट, मणेरी, आडाळी, कळणे, मोरगाव, सासोली, पाटये पुनर्वसन सासोलीखुर्द, घोटगे, खोक्रल, मोर्ले, पिकुळे, तेरवण मेढे, उपस, विर्डी, माटणे, सावंतवाडी तालुक्यातील आंबोली, गेळे, केसरी-फणसवडे, पारपोली, शिरशिंगे, कुडतरकरटेंब, वाफोली, पाडलोस, आरोस, भालावल, डिंगणे, गुळदुवे, निरवडे, ओटवणे, पडवे-माजगाव, रोणापाल, वेत्ये, कणकवली तालुक्यातील असलदे, भिरवंडे, गांधीनगर, शिडवणे, वायंगणी, मालवण तालुक्यातील शिरवंडे, हिवाळे, हेदूळ, असगणी, वराड, आमडोस, बांदिवडे बुद्रुक, आडवली, मिर्याबांद, पेंडुर-खरारे, तिरवडे, वेंगुर्ले तालुक्यातील अणसूर, चिपी, मोचेमाड, परबवाडा, वैभववाडी तालुक्यातील आचिर्णे, आखवणे-भोम, कुंभवडे, मौदे, तिथवली अशा 70 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
गौरव सोहळ्यासाठी सर्व ग्रा.पं.चे सरपंच व आरोग्य कर्मचारी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. येत्या काळात हे अभियान सक्षमपणे राबविताना टीबी मुक्त ग्रा.पं.चे प्रमाण वाढविण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती या सोहळ्याच्या निमित्ताने देण्यात येणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.