नवी दिल्ली : खंडणी गोळा करण्याच्या प्रकरणात कोणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर त्याचे काय हाल करू शकतो, हे दाखवण्यासाठी संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली, असा आरोप पुन्हा एकदा खा. बजरंग सोनवणे यांनी केला. तसेच पुरोगामी जिल्हा असलेला बीड माफियाराज असलेला जिल्हा झाला. जिल्ह्यात फोफावणाऱ्या अवैध धंद्यांना काही राजकीय लोकांनी खतपाणी घातले, असाही आरोप खासदार सोनवणे यांनी केला.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली. त्यानंतर राज्य सरकारच्यावतीने हा तपास सीआयडीकडे देण्यात आला. तसेच यासंबंधी एका एसआयटीचीही स्थापना करण्यात आली. या पार्श्वभूमीवर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले की, संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातीला पोलिसांनी थातूर - मातूर चौकशी केली. आतापर्यंत ७ पैकी ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. अजूनही काही लोक फरार आहेत. आरोपींसह त्यांना मदत करणाऱ्या सर्वांना कडक शासन झाले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
ज्या गाडीने वाल्मीक कराड पुणे सीआयडी कार्यालयात शरण गेला ती गाडी अजित पवार मस्साजोगला देशमुख कुटुंबियांच्या भेटीला गेले होते, त्यावेळी त्यांच्या ताफ्यात होती असा दावा खा. सोनवणे यांनी केला. सोबतच हत्या प्रकरणानंतर ११ डिसेंबरला वाल्मिक कराड उज्जैनवरून परळीकडे निघाला, त्यानंतर १२ डिसेंबरला तो परळीत होता. अनेक ठिकाणी त्याने प्रवास केला. एका ठिकाणी पोलीस यंत्रणा आणि कराडची भेटही झाली. तसेच नागपुरात राज्य मंत्रिमंडळ विस्तार होत असताना १५ डिसेंबरला वाल्मिक कराड नागपुरातच होता, असा दावा करत या दोन्ही वेळी पोलिसांनी त्याला अटक का केली नाही, असा सवालही खा. सोनवणे यांनी विचारला.
राज्य सरकारने या प्रकरणात वरीष्ठ पोलीस अधिकारी बसवराज तेली यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन केली. मात्र यात बीडच्या अधिकाऱ्यांना नेमले आहे. ज्या अधिकाऱ्यांची नेमणूकच जिल्ह्यात काही लोकांच्या आशीर्वादाने झाली होती, त्यांचीच चौकशी करण्यासाठी त्या अधिकाऱ्यांना नेमले आहे. तेव्हा ते या प्रकरणाला कितपत न्याय देणार याबद्दल बीडच्या जनतेच्या मनात शंका आहे, असेही खा. सोनवणे म्हणाले.
बीडमध्ये झालेल्या हत्या प्रकरणानंतर पालकमंत्री कोण होईल यावर मोठी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर खा. सोनवणे म्हणाले की, पालकमंत्री कोणाला करायचे हा सरकारचा प्रश्न आहे. मात्र सरकारमधीलच काही आमदारांनी काही विशिष्ट लोकांना विरोध केला आहे. त्यामुळे अजित पवारांनीच पालकमंत्री व्हावे, असेही उपरोधिकपणे सोनवणे म्हणाले. तसेच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळात मंत्री असलेले धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांनी देशमुख कुटुंबीयांची सांत्वना भेट देखील घेतली नाही. पंकजा मुंडे यांनी त्यांची भूमिका जाहीरपणे मांडली पाहिजे, असेही खा. सोनवणे म्हणाले.
· वाल्मिक कराड शरण येण्यापूर्वी त्याला अटक का झाली नाही ?
· पंचमंडी- गोवा- पुणे एवढा प्रवास करत असताना वाल्मिक कराडचा सुगावा यंत्रणेला कसा लागला नाही?
· सीआयडीला शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराडने जो व्हिडिओ जाहीर केला तो व्हिडिओ शूट केलेली जागा कोणती होती?
· ११ डिसेंबरला गुन्हा दाखल झाल्यापासून त्याचा प्रवास कुठे कुठे झाला, एवढे दिवस त्याच्यासोबत कोण लोक होती?
· वाल्मिक कराडला केजला आणल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात लोक कशी जमा झाली, त्यापूर्वी पुण्यातही लोक कशी आली?