शहाजी पवार
लातूर
देशाच्या स्वातंत्र्यासाठी उभे आयुष्य कारणी लावलेले गांधीबाबा हेच आपले देव आहेत…. अंतकरणातून अवतरलेल्या या उमाळ्याला साक्ष माणून तब्बल ७२ वर्षांपूर्वी महात्मा गांधीजींच्या स्मरणार्थ गावाने सुरू केलेली गांधीबाबा यात्रा ‘उजेड’ गावचे गावकरी प्रतिवर्षी २४ ते २७ जानेवारी दरम्यान आजही भरवत असून शासकीय मदतीची वाट न पहाता लोकाच्या दातृत्वाने राष्ट्रपित्याच्या नावाने भरणारी ही यात्रा या गावचा दसरा- दिवाळी ठरली आहे.
या यात्रेमागची कहाणी मोठी रंजक आहे. पूर्वी हिसामाबाद नावाने ओळखले जाणारे उजेड हे गाव हैदराबाद संस्थानात होते. चाँदपाशा पटेल यांच्याकडे या गावचा कारभार होता. त्यावेळी गावात पिराचा उरूस भरत असे. स्वातंत्र्यांनतर सुमारे एक वर्षाने हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. ऊरूस भरणे बंद झाले होते. स्वातंत्र्यानंतर तो पुन्हा सुरू करण्याची इच्छा चाँदभाईंना झाली. यासाठी त्यांनी पंचायत बोलावली. हिंदूना महादेवाची यात्रा तर मुस्लिमांना पिराचा उरूस हवा होता परिणामी दोन गट पडले व ते आपापल्या मागणीवर ठाम राहीले. शेवटी हा तिढा सोडवण्याची जबाबदारी गावकऱ्यांनीच राम रेड्डी, गोविंद मास्तर, भीमराव रेड्डी, वामनराव पवार, मल्लिकार्जुन बिराजदार, चाँदभाई, नारायण खोडदे, धोंडीराम बिराजदार, राजाराम कांबळे, बाजीराव पाटील, शिवलिंग स्वामी, दिगंबर पटवारी यांच्यावर सोपवली. ही मंडळी जो निर्णय घेतील तो सर्वमान्य राहील असे ठरले. दुसऱ्या दिवशी पुन्हा पंचायत बसली. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे गांधीबाबा हेच आपले देव आहेत. त्यांच्या नावाने यात्रा सुरू करावी असा सल्ला या मंडळींनी दिला. काही तासांपूर्वी गंभीर असलेल्या गावकऱ्यांनी या निर्णयाचे साखर वाटून स्वागत केले. आणि २६ जानेवारी १९५४ पासून गांधीबाबा यात्रा सुरू झाली.
असा आणला पुतळा
गांधी बाबा यात्रेसाठी पुतळा आणण्याचे गावकऱ्यांनी ठरवले. त्यासाठी पैसे हवे होते. त्यावेळी रामराव गुरुजी व अन्य मंडळीनी गावकऱ्यांना आवाहन केले. पैसे नसतील तर धान्य द्या असा पर्याय ही त्यांनी दिला गावकऱ्यांनी त्यास अंतकरणातून प्रतिसाद दिला. धान्याच्या राशी जमल्या अन ते विकून त्यातून आलेल्या पैशात हैदराबाद येथून गांधीजींचा छोटा पूर्णाकृती आणल्याची आठवण कै. रामराव गुरुजींनी प्रस्तुत प्रतिनिधीस सांगितली होती.
अशी असते यात्रा
या यात्रेसाठी सासुरवाशिणी माहेरी येतात. त्यांना मानाची साडी – चोळी केली जाते. नातेवाईकानाही आग्रहाचे निमंत्रण मिळते. नोकरी-धंद्यानिमित्त बाहेरगावी असलेल्या व्यक्ती उजेडला येतात. पंचक्रोशीतील गावकरीही सामील होतात. घरा- घरात गोडधोड होते. चौकात बाजार भरतो. दीपावलीलारखा माहोल गावभर असतो. २४ जानेवारीला ग्रामपंचायतीतील महात्मा गांधींचा पुतळा वाजत गाजत चौकात स्थापन केला जातो. त्याचे पूजन केले जाते. आणि प्रजासत्ताक दिनी त्यास पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. राष्ट्रभक्ती जागवणारे कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेतल्या जातात.
पशुप्रदर्शन भरते, कुस्ती स्पर्धेने यात्रेची सांगता होते.
हिसामाबादचे झाले उजेड यात्रा सुरू झाली तेव्हा गावात विजेची सोय नव्हती. चांदभाईंचे बंधू अब्दुल यांनी पाण्याच्या इंजिनवर वीज निर्माण करून अनेक बल्ब सुरू केले होते. यामुळे गांधी चौक लखलखत होता. पहिल्या गांधी पूजन आणि ध्वजारोहणासाठी त्यावेळच्या उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते. हा माहोल पाहून ते आश्चर्यचकित झाले. उस्मानाबाद जिल्ह्यातील या गावातच असा उजेड मी पाहिला त्यामुळे या गावाला आता ‘उजेड’ म्हणावे लागेल, असे ते सहज बोलून गेले. तेव्हापासूनच हिसामाबादचे नाव उजेड झाले.
प्रसाद म्हणून जिलेबी
गांधीबाबांचा प्रसाद म्हणून पंचक्रोशीतील गावकरी जिलेबी विकत घेतात. अवघ्या चार दिवसात सुमारे सव्वातीन लाखांची अडीच हजार किलो जिलेबी विकली जाते, असे उजेड येथील मिठाई विक्रेते अजित कदम यांनी सांगितले.