FDA Action Pudhari
अपडेट्स

Nashik FDA Action | नाशिकमधील प्रसिद्ध मिसळ हॉटेल्सवर कारवाई; चार आस्थापनांचे परवाने रद्द

Nashik FDA Action | विशेषतः परवाने, अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्नसाठवणुकीच्या नियमांची पूर्तता केली आहे की नाही, याची तपासणी होत असल्यामुळे व्यावसायिकांनी धास्ती घेतली आहे.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई सुरू केल्याने शहरातील हॉटेल व्यावसायिक चांगलेच धास्तावले आहेत. विशेषतः परवाने, अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्नसाठवणुकीच्या नियमांची पूर्तता केली आहे की नाही, याची तपासणी होत असल्यामुळे व्यावसायिकांनी धास्ती घेतली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अन्न प्रशासनाच्या पथकांकडून शहरातील विविध खाद्य आस्थापनांची तपासणी केली जात आहे. तपासणीदरम्यान स्वच्छतेचा अभाव, अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक, नियमांचे उल्लंघन आणि आवश्यक परवान्यांबाबत त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जात आहे.

साबुदाणा वड्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सायंतारा हॉटेलसह शहरातील प्रसिद्ध मिसळ केंद्रांवरही प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्यामुळे हॉटेल व्यावसायिक चांगलेच धास्तावले आहेत.

विहार, श्यामसुंदर, तुषार आणि महाराजा काठियावाडी या चार प्रसिद्ध मिसळ आस्थापनांचे परवाने रद्द केल्याने, खाद्य व्यावसायिकांत अधिकच चिंता निर्माण झाली आहे. नावाजलेल्या आस्थापनांवरही कारवाई होत असल्यामुळे केवळ प्रसिद्धी किंवा ग्राहकांची गर्दी असून चालणार नाही, तर अन्नसुरक्षा नियमांचे पालन करणे अनिवार्य असल्याचा संदेश या कारवायांतून दिला जात आहे.

स्वच्छतेवर सर्वाधिक भर : अन्न प्रशासनाच्या या मोहिमेमुळे अनेक हॉटेलचालकांनी आपल्या आस्थापनांमधील स्वच्छता, अन्नपदार्थांची साठवणूक, कर्मचाऱ्यांची आरोग्यविषयक कागदपत्रे, परवाने आणि इतर आवश्यक नोंदींची पडताळणी सुरू केली आहे. अन्नपदार्थ तयार करण्याच्या ठिकाणापासून ते ग्राहकांना वाढण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर स्वच्छता राखण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

नागरिकांकडून स्वागत : अन्न प्रशासनाने केलेल्या धडक कारवायांचे नाशिककरांनी मात्र स्वागत केले आहे. प्रसिद्ध हॉटेल्समध्ये जर स्वच्छतेचे निकष पाळले जात नसतील, तर त्यांच्यावर प्रशासनाने केलेली कारवाई योग्यच असल्याचे नागरिकांचे मत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT