मुंबई : पुढारी वृत्तसेवा
आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती असलेल्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो एअर लाइन्सच्या 'ग्राउंड स्टाफ' पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र, या भरतीसाठी अस्खलित इंग्रजी बोलण्याचे बंधन अनिवार्य करण्यात आले आहे. कंपनीच्या या जाचक अटींमुळे स्थानिक महाराष्ट्रीय तरुण-तरुणींच्या नोकरीच्या संधीवर थेट गदा आली आहे. इंग्रजीच्या या अघोषित सक्तीमुळे मराठी उमेदवारांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. दरम्यान, इंग्रजीसह मराठी येण्याची अट असायला पाहिजे, अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे.
मुंबई विमानतळावर नोकरी मिळवून आपले करिअर घडवण्याचे हजारो मराठी तरुणांचे स्वप्न असते. मात्र, ग्राउंड स्टाफसारख्या पदासाठीही इंग्रजी संभाषण कौशल्याची सक्ती लादण्यात आल्याने ग्रामीण व शहरी भागातील अनेक पात्र मराठी उमेदवार या भरती प्रक्रियेतून मुळापासूनच बाहेर फेकले जात आहेत. महाराष्ट्राच्या भूमीतील विमानतळावर काम करताना स्थानिक मराठी भाषेला प्राधान्य देण्याऐवजी इंग्रजीची सक्ती का? असा संतप्त सवाल नोकरीच्या शोधात असलेल्या मराठी तरुण-तरुणींकडून विचारला जात आहे. ही जाचक अट तत्काळ शिथिल करावी. इंग्रजीसह मराठी येण्याची अट असावी, अशी आक्रमक मागणी आता जोर धरू लागली आहे.
अशा आहेत इंडिगोच्या जाचक अटी...
इंडिगोने जाहीर केलेल्या या भरतीनुसार, 'ग्राउंड स्टाफ' पदासाठी उमेदवाराची कमाल वयोमर्यादा २७ वर्षे ठेवण्यात आली आहे. याशिवाय उमेदवार पदवीधर असणे आणि त्याला इंग्रजीमध्ये उत्तम संभाषण कौशल्य असणे बंधनकारक आहे. धक्कादायक म्हणजे, जे उमेदवार सध्या पदवीचे शिक्षण घेत आहेत किंवा पदवीधर नाहीत, त्यांना या पदासाठी साधा अर्ज करण्यासही अपात्र ठरवण्यात आले आहे.
असा करा अर्ज...
पात्र उमेदवारांना येत्या २२ नोव्हेंबर २०२६ पर्यंत सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत, टर्मिनल १ (टी एन), इंडिगो एईपी ऑफिस, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, विलेपार्ले (पूर्व) येथे आपल्या बायोडाटा आणि फोटोसह अर्ज सादर करायचे आहेत