पुढारी ऑनलाईन न्यूज : इस्त्रायल ने गाझापट्टीमध्ये केलेल्या हल्ल्यात पाच पत्रकार ठार झाले आहेत. एएनआय ने दिलेल्या वृत्तानूसार गाझा येथे असलेल्या अल आवादा हॉस्पिटल समोर अल क्वॉद या चॅनेलचे वाहन पार्किंग केले होते. या थांबलेल्या वाहनावार हा हल्ला झाला आहे. हे चॅनेल पॅलेस्टाईन इस्लामिक जिहादी ग्रुपशी संबधित आहे असा इस्त्रायलने दावा केला आहे.
अयमान अल जादी, फैसल अल उस्मान, मोहम्मद अल लदा, इब्राईम अल शेख अली आणि फादी हसौन हे पत्रकार या हल्ल्यात ठार झाले आहेत. हे सर्वजण चॅनेलच्या वाहनामध्ये झोपले होते, त्याचवेळी हा हल्ला झाला. असे घटनास्थळी पोहचलेल्या इतर पत्रकारांनी सांगितले.
या घटनेच्या समोर आलेल्या व्हिडीओ फुटेजमध्ये हे वाहन ज्वालानी वेढलेले आहे. या वाहनाच्या पाठीमागील दरवाजावर स्पष्ट शब्दात TV आणि PRESS असे लिहले होते. अल क्वॉद टिव्ही चॅनेलने या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांच्या म्हटले आहे की आमचे पाच लोक ठार झाले आहेत. जे पत्रकारीता आणि मानवतेच्या कर्तव्यासाठी युद्धभूमीवर उभे होते.
तर इस्त्रायलच्या सैन्यदलाने यासंबधी आपले स्टेटमेंट दिले आहे. त्यांच्या म्हणन्यानूसार आम्ही इस्लामिक जिहादींच्या दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी नुसरत विभागात हा हल्ला केला आहे. आणि ठार झालेले पत्रकार होते असा कोणताही पुरावा उपलब्ध नाही.
सीपीजी (कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट) या संस्थेने दिलेल्या माहितीनूसार आतापर्यंत पत्रकार व कॅमेरामॅन अशी १४१ जणांचा मृत्यू झाला आहे. गाझा पट्टी, इस्त्रायल, लेबनॉन याठिकाणच्या युद्धक्षेत्रात आतापर्यंत या घटना घडल्या आहेत. ७ ऑक्टोबर २०२३ पासूनची ही आकडेवारी आहे.