निलंगा : तालुक्यातील शेतकऱ्यांना आधार कार्डाप्रमाणे एक युनिक आयडी क्रमांक देण्यात येणार आहे. हा युनिक आयडी क्रमांक घेऊन सरकार शेतकऱ्यांची माहिती एकत्र करणार आहे. निलंगा तालुक्यातील ७२ हजार शेतकऱ्यांना युनिक फार्मर आयडी कार्ड मिळणार आहे. त्यासाठी निलंगा तालुक्यातील (लातूर) १६३ गावातून प्राथमिक स्वरुपात नणंद गावातून सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी तेथील कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदी, गाव नकाशांच्या नोंदी डिजिटल केल्या जाणार आहेत. तसेच निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आले आहे. त्यातून पीक संरक्षण, जमिनीचे आरोग्य, हवामान अंदाज, भूजल पातळी यासारखी माहिती महत्त्वाची अद्ययावत व एकत्र करून त्यावर आधारित सपोर्ट सिस्टीम उभारण्यात येणार आहे. म्हणजेच पाऊस किती पडणार? यासारख्या महत्त्वाच्या नोंदी असणार आहेत.
शेतकऱ्यांना कृषी योजनांच्या लाभासाठी प्रत्येक वेळी कागदपत्रांची आवश्यकता असते. त्यामुळे नेहमी खर्च करावा लागतो. तसेच शेतकऱ्यांना संबंधित कार्यालयात जाऊन हेलपाटे मारावे लागतात. त्यातून शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. या युनिक आयडीमुळे तालुक्यातील ७२ हजार शेतकऱ्यांचा मनस्ताप कमी होणार आहे.
फार्मर आयडीसाठी शेतकऱ्यांचा ७/१२, आधार कार्ड संलग्न असलेला मोबाईल क्रमांक यासह इतर कागदपत्रांचा त्यात समावेश आहे. महसूल विभागाकडे नोंद असलेल्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांचे कागदपत्रे महसूल विभागाकडे नोंद नाहीत अशा शेतकऱ्यांनी आपल्या नावावर असलेल्या शेत जमिनीचा ७/१२, आधार कार्ड संलग्न असलेला मोबाईल क्रमांक यासह इतर कागदपत्रे संबंधित कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी यांच्याकडे जमा करावे लागणार आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात शेतीत डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आणून प्रत्येक शेतकऱ्याला युनिक आयडी देण्याचा संकल्प शासनाने केला आहे. त्याप्रमाणे शेतकऱ्यांना फार्मर आयडी अनेक कामांसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे.
शेतकऱ्यांना आधार कार्डाप्रमाणेच स्वतंत्र ओळखपत्र वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी महसूल विभागाकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली असून, एक डिसेंबर रोजी ही योजनेला सुरुवात झाली असून आठवड्याभरात शासनाकडून ॲप चे काम पूर्ण होणार आहे, त्यानंतर शेतकऱ्यांच्या युनिक आयडी कार्ड चे काम ॲप च्या मध्यामातून लवकरच सुरू होऊन महिना भरात हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती निलंगा तहीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी दिली आहे.
शासनाने ही योजना एक डिसेंबर रोजी पासून सुरुवात केली असून प्राथमिक स्वरुपात निलंगा तालुक्यातील १६३ गावांपैकी नणंद या गावातून सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी नणंद गावाचे कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी यांची मास्टर ट्रेनर म्हणून नेमणूक केली आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर त्यांना दि. ११ डिसेंबर रोजी प्रशिक्षण देण्यात आले आहेत. नोडल अधिकारी म्हणून नायब तहसीलदार प्रवीण आळंदकर यांची नेमणूक करण्यात आली असून जिल्हा स्तरावर कासार शिरसी येथील तहसीलदार शिवाजी कदम तर तालुका स्तरावर निळकंठ ननावरे यांची नेमणूक करण्यात आली आहे.प्रसाद कुलकर्णी, तहसीलदार, निलंगा