Latest

अनेक ग्रहांवर पडतो हिर्‍यांचा पाऊस! संशोधकांचा दावा

Arun Patil

वॉशिंग्टन : वर्षातील दिवस, हवामान, समुद्र वगैरे अनेक गोष्टी आपण केवळ पृथ्वीला नजरेसमोर ठेवूनच समजून घेत असतो. मात्र, ब्रह्मांडाचा विचार केला तर आपली ही वृत्ती 'विहिरीतील बेडका'सारखी 'कुपमंडूक'च ठरते! 'टायटन'सारख्या चंद्रावर मिथेनचेही महासागर आहेत. अशाच प्रकारे अनेक ग्रहांवर पाऊसही वेगवेगळ्या घटकांचा होऊ शकतो. आता तर संशोधकांनी म्हटले आहे की ब्रह्मांडातील अनेक ग्रहांवर हिर्‍यांचाही पाऊस पडतो!

याबाबतच्या संशोधनाची माहिती 'सायन्स अ‍ॅडव्हान्स' या नियतकालिकात देण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की 'हिर्‍यांचा पाऊस' हा आपल्या विचारांपेक्षा अधिक सामान्य घटना ठरू शकतो. वैज्ञानिकांचे हे अनुमान आपल्या ग्रहमालिकेतीलच युरेनस आणि नेपच्यून या ग्रहांवरील विचित्र पावसावर आधारित होते. यापूर्वीही वैज्ञानिकांनी म्हटले आहे की बर्फाळ ग्रहांवर अत्याधिक दाब आणि तापमान हायड्रोजन व कार्बनला ठोस हिर्‍यात रूपांतरीत करते.

या दोन ग्रहांना आपल्या सौरमंडळाबाहेरील बर्फाळ ग्रहांचे एक सर्वात सामान्य रूप मानले जाते. या दोन ग्रहांवर जसा हिर्‍यांचा पाऊस होतो तसाच ब्रह्मांडातील अन्य ग्रहांवरही होऊ शकतो. जर्मनीच्या 'एचझेडडीआर रिसर्च लॅब'मधील डॉमनिक क्रॉस यांनी सांगितले की पृथ्वीवरील पाण्याच्या पावसापेक्षा हा हिर्‍यांचा वर्षाव वेगळा असतो. संशोधकांनी हिरे बनण्याची प्रक्रिया समजावून सांगण्यासाठी पीईटी प्लास्टिकचा वापर केला.

याच प्लास्टिकपासून पाण्याच्या बाटल्या आणि फूट पॅकेजिंग होते. टीमने कॅलिफोर्नियात एसएलएसी नॅशनल एक्सेलेरेटर लॅबोरेटरीत कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे मिश्रण-पीईटी प्लास्टिकवर एक उच्च शक्‍तीचे ऑप्टिकल लेसर सोडले. अतिशय हलक्या एक्स-रे किरणांमध्ये त्यांना नॅनोडायमंडस् म्हणजे हिर्‍यांची सूक्ष्म स्फटिके बनण्याची प्रक्रिया पाहायला मिळाली. हे हिरे इतके सूक्ष्म होते की त्यांना केवळ उघड्या डोळ्यांनी पाहणे कठीण आहे. संशोधकांनी सांगितले की ग्रहांवर मोठ्या प्रमाणातील ऑक्सिजन कार्बनमधून हायड्रोजनचे अणू बाजूला करण्यासाठी मदत करतात. या प्रक्रियेत हिर्‍यांची निर्मिती होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT