Latest

अनाथ मुलांची आनंदमय दिवाळी

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दै. 'पुढारी' प्रयोग सोशल फाऊंडेशन व एन.के.पी.प्लसने (विहान) 'एचआयव्ही'सह जगणार्‍या गरजू व अनाथ मुलांची दिवाळी आनंदमय केली. निमित्त होते 'एक पणती माणुसकीची' उपक्रमाचे!

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी समाजातील उपेक्षित, वंचित घटकांसाठी अविरतपणे कार्य केले. त्यामुळेच शाहूनगरी कोल्हापूरला दातृत्वाची मोठी परंपरा लाभली. राजर्षी शाहूंच्या कार्यप्रेरणेतून व दानशूर व्यक्तींच्या सहभागातून राजर्षी शाहू स्मारक भवन येथे 'एक पणती माणुसकीची' उपक्रमाचे आयोजन केले होते.

अध्यक्षस्थानी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख होत्या. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमांतर्गत मुलांना दिवाळी साहित्य – नवीन कपडे, मिठाई, प्रोटिनयुक्त च्यवनप्राश व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. देशमुख म्हणाल्या, समाजात अजूनही 'एचआयव्ही'बद्दल समज-गैरसमज आहेत. भेदभाव निर्मूलनासाठी समाजाने पुढाकार घेतला पाहिजे. शिपूरकर म्हणाल्या, जिल्हा एड्स नियंत्रण विभागातर्फे 'विहान' प्रकल्प 'एचआयव्ही'सह जगणार्‍या व्यक्तींची काळजी व आधार केंद्र म्हणून यशस्वीपणे कार्यरत आहे.

संजय साऊळ यांनी प्रास्ताविक केले. 'प्रयोग'चे समन्वयक विक्रम रेपे यांनी सूत्रसंचालन केले. श्रद्धा मोरे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. दीपक भोसले, 'रोटरी'चे राहुल कुलकर्णी, 'विहान'च्या अध्यक्षा वैशाली बगाडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी 'एचआयव्ही एड्स कायदा 2017'मधील 'कलंक व भेदभाव' याविषयी माहिती देणार्‍या भित्तिपत्रकाचे अनावरण करण्यात आले.

उपक्रमास संस्था, व्यक्तींचे विशेष सहकार्य…

रोटरी क्लब कोल्हापूर सनराईज, गौरव सावंत, आशिष तुर्किया, सौरभ नाईक, संजय कांबळे, डॉ. जितेंद्र लोखंडे, डॉ. ऋतुजा कदम, सुभाष देसाई, प्रथमेश घोरपडे, आनंद औरसंग, उदय गुरव, अंकुली कुलकर्णी, सत्यजित खाडे यांचे उपक्रमास विशेष सहकार्य लाभले. दर्पण फाऊंडेशनच्या राम भोळे, योगीता पाटील यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.

दै. 'पुढारी'चे उपक्रमास सातत्याने पाठबळ

दै. 'पुढारी' प्रयोग सोशल फाऊंडेशनने गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने या उपक्रमास पाठबळ दिले आहे. दै. 'पुढारी'ने केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणून अनेक दानशूर व्यक्ती या उपक्रमात सहभागी होत आहेत. गरजूंना मदतीचा ओघ सुरू आहे. त्याबद्दल मान्यवरांनी दै. 'पुढारी'चे आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT