वाई; पुढारी वृत्तसेवा : कनूर येथील दीड वर्षांपूर्वी मंजूर झालेले अंतर्गत रस्त्याचे काम पूर्ण न केल्याने वाई पंचायत समिती सदस्य दीपक ननावरे यांनी आक्रमक होत वाई पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील अधिकार्यांची खुर्चीच काढून घेतली. या प्रकाराने वाई पंचायत समिती परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, कामे न करता अधिकारी फक्त खुर्चीवर बसून राहात असल्याने त्यांची खुर्ची काढून घेण्यात आल्याचे ननावरे यांनी सांगितले.
गेल्या दीड वर्षांपूर्वी बावधन जवळील कनूर गावातील महादेव मंदिराकडे जाणार्या रस्त्याच्या कामाचे टेंडर पास करण्यात आले होते. अंदाजे 2 लाख 30 हजार रुपयांचे काँक्रिटीकरणाचे काम होते. फेब्रुवारी 2021 मध्ये कामाचा प्रारंभसुद्धा करण्यात आला होता. परंतु गेल्या दीड वर्षात संबधित कामाची वर्कऑर्डर काढण्यात आलेली नाही. बुधवार दि. 8 जून रोजी पंचायत समितीच्या बांधकाम विभागात संबंधित कामाची चौकशी करण्यासाठी पंचायत समिती सदस्य दीपक ननावरे गेले. दरम्यान संबंधित कामाबाबत अधिकार्यांना त्यांनी विचारणा केली असता अधिकार्यांनी ननावरे यांना उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या ननावरे यांनी संबंधित अधिकार्यांच्या कार्यालयातील त्यांची खुर्चीच काढून घेतली.
यावेळी बोलताना ननावरे म्हणाले, संबंधित अधिकार्यांना या खुर्चीवर बसण्याचा नैतिक अधिकार नाही म्हणूच खुर्च्या काढून घेतल्या आहेत. संबंधित काम झाल्याशिवाय त्या खुर्च्या परत करण्यात येणार नाहीत. तरीही काम पूर्ण न झाल्यास त्यांचे बसण्याचे टेबल सुध्दा लवकरच काढून घेण्यात येतील, असा इशाराही ननावरे यांनी दिला आहे.