टेक्सास : सध्या युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेले युद्ध दिवसागणिक गंभीर बनू लागले आहे. हे युद्ध कधीही अणुयुद्धाचे स्वरूप घेऊ शकते. अशा स्थितीत आपल्या लोकांना वाचविण्यासाठी एका अमेरिकन कंपनीने लक्झरी डूम्सडे बंकरसाठी गुंतवणूक करण्याचे आवाहन केले आहे. या बंकरमध्ये ग्रीन हाऊस आणि शूटिंग रेंजचाही समावेश असणार आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन हे वारंवार अणुहल्ल्याची धमकी देत असल्याने जगाची चिंता वाढत चालली आहे. याशिवाय अणुयुद्धासाठी लोकांनी आता तयार व्हावे, असे विशेषज्ञ सांगत आहेत. यामुळे लोकही आता आपले घर अपग्रेड करून स्वतःला सुरक्षित ठेवण्याचे पर्याय शोधत आहेत.
अमेरिकन राज्य टेक्सासमधील एका फर्मने संभाव्य अणू हल्यापासून वाचू पाहणार्या लोकांसाठी एक नव्या प्रकारची व्यवस्था सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून या फर्मने चार बेडरूम असलेला सर्वाइव्हल सेंटर असलेले बंकर दाखवले आहे. यास राईजिंग बंकर असे नाव देण्यात आले आहे.
राईजिंग बंकरमध्ये खोल्यांबरोबर हॉल, किचनमध्ये मायक्रोवेव्ह, ओव्हन, फ्रीज असेल. तर खाण्या-पिण्याच्या वस्तूंचे मोठे भांडार असेल. खास बाब म्हणजे बंकरमध्ये ग्रीनहाऊस बागा असतील. तेथे भाजी, फळांची लागवड होईल. उल्लेखनीय म्हणजे अणुयुद्धावेळी धोकादायक केमिकल आणि गॅसपासून वाचविण्यासाठी या बंकरमध्ये खास फिल्टरेशन सिस्टीम बसविण्यात आली आहे. त्यामुळे कसलाच परिणाम होणार नाही.