वॉशिंग्टन : एलन मस्क यांची कंपनी 'टेस्ला'ने यापूर्वीच चालकरहित कार बनवलेली आहे. मात्र, आता चालकरहित ट्रकही बनवले जात आहेत. मार्चमध्ये एका 'सेल्फ ड्रायव्हिंग 18 व्हीलर ट्रक'ने अमेरिकेच्या डलास आणि अटलांटादरम्यान पाच दिवस मालवाहतुकीचे काम केले. या ट्रकने 10,138 किलोमीटरपेक्षा अधिक अंतराचा प्रवास केला. त्याने चार फेर्या मारल्या आणि आठ कंटेनर मालाची डिलिव्हरी केली.
हा ट्रक एका सेल्फ-ड्रायव्हिंग स्टार्टअप 'कोडिएक रोबोटिक्स' आणि एक ट्रक कंपनी 'यूएस एक्स्प्रेस'ने एकत्रितपणे बनवला आहे. अशा चालकरहित ट्रकची किती क्षमता आहे हे या ट्रकने पाच दिवसांमध्येच दाखवून दिले. या पाच दिवसांत चालकरहित ट्रकने जे काम करून दाखवले ते चालक असलेल्या ट्रककडून करवून घेण्यास दहा दिवसांपेक्षाही अधिक वेळ लागतो. 'कोडिएक'ने रोज तज्ज्ञांची एक नवी टीम ट्रकच्या केबिनमध्ये बसवली जेणेकरून काही चूक झाल्यास त्यावर नियंत्रण मिळवता येईल. 'कोडिएक'सारख्या स्टार्टअपने सेल्फ ड्रायव्हिंग ट्रकांच्या निर्मितीसाठी तसेच त्यांच्या चाचण्यांसाठी अनेक वर्षे घालवली आहेत.
अनेक ट्रक कंपन्या या तंत्रज्ञानाचा लाभ घेऊ इच्छितात. सध्या ग्लोबल सप्लाय चेन म्हणजेच जागतिक पुरवठा साखळी बाधित झालेली असताना अशा ट्रकांची अधिकच आवश्यकता निर्माण झाली आहे. मात्र, अशा ट्रकमुळे भविष्यात चालकांच्या नोकर्याही धोक्यात येऊ शकतात हे तितकेच खरे आहे. अर्थात चालकांना अशा ट्रकमधून प्रवास करता येईल व त्यांना अधिक काळ आपल्या घरापासून दूर राहण्याची गरज राहणार नाही असेही म्हटले जाते.