अलंकापुरीमध्ये वारकर्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. मागील तीन वर्षांपासून माऊलीच्या दर्शनाला भुकेलेले आणि पंढरीच्या वारीला मुकलेले लाखो वारकरी आळंदीत दाखल होत आहेत. वारीची परंपरा कोरोनामुळे दोन वर्षांसाठी खंडित झाली असली तरी वारकर्यांचा उत्साह आणि माऊलीबद्दलची भक्ती किंचितही कमी झालेली नाही.
यंदा पाऊसकाळ नसल्याने शेतकरी वारकर्यांची संख्या त्यामानाने कमी राहणार आहे. पुढील आठवड्यात पाऊस सुरू झाला, तर पेरणी आटोपून अनेक वारकरी सासवड, जेजुरीनंतर पुन्हा वारीमध्ये सहभागी होतील.
संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याला आळंदी येथून सुरुवात होत आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेली वारी आणि सुमारे चारशे वर्षांची परंपरा असलेला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मंगळवारपासून सुरू होत आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी येथील संजीवन समाधी मंदिरातील पादुकांचे दर्शन घेऊन वारकरी ही वारी सुरू करणार आहेत. मंगळवारी दुपारी चार वाजता माऊलींच्या पादुका 'पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारामच्या गजरात' पालखीमध्ये ठेवण्यात येतील.
त्यानंतर माऊलींच्या पालखीचा मुक्काम त्यांच्या आजोळी म्हणजे कुलकर्णी यांच्या घरी असणार आहे. ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा गेली दोन वर्षे होऊ शकला नव्हता. 2019 साली हा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला होता. माऊलींच्या पालखी सोहळ्यात रथासमोर 27 दिंड्या असतात, तर रथाच्या पाठीमागे 241 दिंड्या असतात. या पावणेतीनशे दिंड्यांमध्ये दीड ते दोन लाख वारकरी सहभागी असतात. आळंदीतून हा सोहळा सुरू झाल्यानंतर पुणे, सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद, तरडगाव, बरड, नातेपुते, माळशिरस, वेळापूर भंडी शेगाव, वाखरी असा मुक्काम करत 9 जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचणार आहे.
यावर्षी संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात मोठ्या प्रमाणात वारकरी सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, जून महिना संपत आला तरी अजून महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाचा पत्ता नाही. याचा परिणाम सुरुवातीच्या काळात या वारीमध्ये सहभागी होणार्या वारकर्यांच्या संख्येवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या 20 वर्षांतील अनेक पालखी सोहळ्यांचा अभ्यास केला, तर पावसाचा परिणाम वारीवर होतो, असे अभ्यासक सांगतात.
वारीमध्ये राज्यभरातील सर्व जिल्ह्यांतील दिंड्या आणि वारकरी सहभागी होत असले तरी सर्वात जास्त वारकर्यांची संख्या मराठवाडा-विदर्भातील असते. या भागातील शेतकरी वारकरी पावसाच्या आगमनानुसार वारीत सहभागी होत असतात. पाऊस-पाणी व्यवस्थित झाले, तरच पेरणी करून हे वारकरी आळंदी, देहूपासूनच सहभागी होतात. पेरण्या आटोपल्यानंतरच हे शेतकरी आळंदी किंवा देहू या ठिकाणी दाखल होतात. पुढील आठवडाभरात पावसाने सुरुवात केली, तर पेरण्या उरकून हे शेतकरी पुढील काळात सासवड – जेजुरीमध्ये वारीत सहभागी होतील. माऊलींच्या कृपेने गेल्या काही दिवसांपासून मान्सूनचे आगमन कोकणात झाले आहे. हा पाऊस पुढे राज्यभर सरकला, तर शेतकर्यांच्या आशा पल्लवित होणार आहेत.
सतीश मोरे
माऊली सोहळ्यात मराठवाडा – विदर्भातून येणार्या वारकर्यांची संख्या फार मोठी आहे. आतापर्यंत वारीचा इतिहास पाहिला, तर पावसावर वारीतील वारकर्यांची कमी-जास्त संख्या अवलंबून असते. आळंदीला येऊ न शकणारे वारकरी पेरण्या आटोपून पुढे वारीत सहभागी होतात. आषाढी एकादशीला पंढरपूरला किमान 10 ते 12 लाख वारकरी सहभागी होतील.
– राजाभाऊ चोपदार, माऊली सोहळ्याचे वंशपरंगत चोपदार