वॉशिंग्टन : अंतराळात मानवी वसाहत स्थापन होण्याची स्वप्ने पाहणार्यांसाठी आता एक खूशखबर आली आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ने प्रथमच अंतराळ स्थानकावर सिमला मिरचीचे (ढबू मिरची) उत्पादन घेण्यात यश मिळवले आहे. 'प्लँट हॅबिटॅट-04' मध्ये हे उत्पादन घेण्यात आले. या सिमला मिरचीचा स्वादिष्ट खाद्यपदार्थ बनवून स्थानकावर राहणार्या अंतराळवीरांनी त्याचे सेवन करण्याची मजाही लुटली! 'नासा'ने म्हटले आहे की याबाबत सूक्ष्म जीवांचेही विश्लेषण करण्यात आले आहे.
अंतराळातील प्रकल्पामधील जीवाणूंच्या संबंधांबाबत अधिक माहिती मिळवणे आणि ती सरस बनवणे यासाठी हे संशोधन महत्त्वाचे ठरेल. तसेच सिमला मिरचीमधील पोषक घटक, स्वाद आणि रचना यांचीही तपासणी केली जाऊ शकेल. या सिमला मिरचीचे रोप यावर्षीच्या जुलैपासूनच विकसित केले जात होते. अशी सिमला मिरची न्यू मेक्सिकोच्या हॅच व्हॅलीमध्ये आढळते.
न्यू मेक्सिकोच्या 'सांडिया' मिरची आणि अन्य एका प्रजातीच्या मिश्रणातून ही नवी प्रजाती विकसित करण्यात आली. या खोर्यातील सिमला मिरची ज्यावेळी हिरवी असते त्यावेळीच खाल्ली जाऊ शकते. मात्र, 'एस्पानोला इम्प्रुव्हड' प्रजातीच्या मिरची हिरव्या आणि लाल अशा दोन्ही स्थितीत खाल्ल्या जाऊ शकतात. स्पेस स्टेशनच्या ट्विटर अकाऊंटने या रोपांना आतापर्यंतचा सर्वात आव्हानात्मक प्रयोग ठरवले आहे.
अन्य पिकांच्या तुलनेत सिमला मिरचीचे अंतराळात उत्पादन घेणे अधिक कठीण मानले जाते. याचे कारण म्हणजे त्यासाठी अधिक वेळ लागत असतो. 'नासा'च्या अंतराळवीरांगना मेगन मॅकआर्थर यांनी या मिरच्या तोडण्यापासून त्याचे जेवण बनवण्यापर्यंतचे फोटो शेअर केले आहेत. यापूर्वी 'नासा'ने अंतराळात चिनी पालक आणि अन्य काही पिकांचे उत्पादन घेतले आहे.