मॉस्को : अंतराळात पहिला उपग्रह, माणूस, प्राणी पाठवणे असे विक्रम करणार्या रशियाने आता अंतराळात प्रथमच चित्रपटाचे शूटिंग करण्याची तयारी केली आहे. एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी पथकाला अंतराळात पाठवले जात आहे.
रशिया आपल्या सोयूज यानातून चित्रपटाशी संबंधित या पथकाला अंतराळात रवाना करीत आहे. कझाकिस्तानातील कॉस्मोड्रोममधून हे पथक रवाना होईल. या अंतराळ मोहिमेत चित्रपटाची अभिनेत्री, दिग्दर्शक आणि दोघांसाठी एक व्यावसायिक अंतराळवीर गाईड पाठवला जात आहे. चित्रपटासाठी अंतराळाचे शूटिंग केले जाईल.
असे सीन्स असणारा हा जगातील पहिलाच चित्रपट ठरेल. सोयूझ यानातून हे पथक पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाईल. रशियन अभिनेत्री यूलिया पेरेसिल्ड आणि दिग्दर्शक क्लिम शिपेंको हे या मोहिमेतून रवाना होत आहेत.
त्यांच्यासोबत अनुभवी अंतराळवीर अँटोन श्काप्लेरोव्ह हे आहेत. ते त्यांचे गाईड म्हणून काम करतील. अँटोन यांनी 2011 नंतर तीनवेळा अंतराळ स्थानकाचा दौरा केलेला आहे. यूलिया पेरेसिल्ड अनेक महिन्यांपासून या मोहिमेसाठीचे खास प्रशिक्षण घेत होती. तिने याच वर्षीच्या सुरुवातीला अनेक अभिनेत्रींबरोबर चित्रपटासाठीचे ऑडिशन दिले होते. त्यानंतर तिची निवड करण्यात आली.
या चित्रपटाला सध्या 'द चॅलेंज' असे नाव देण्यात आले आहे. त्यामध्ये यूलिया एका सर्जनची भूमिका करील. ती अंतराळ स्थानकावर एका जखमी अंतराळवीराचे प्राण वाचवण्यासाठी स्थानकावर जाते. त्याची काही दृश्ये स्थानकावर कॅमेराबद्ध करण्यात येतील.