नाशिक : शाळेच्या विदारक परिस्थितीबाबत विचारणा करताना भूमिपुत्र फाउंडेशनचे पदाधिकारी.  
Latest

Zilha Parishad School : पहिली ते आठवीचे विद्यार्थी एकाच वर्गात!

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भव्य इमारत अन‌् प्रशस्त वर्गखोल्या… शिक्षकांची पदेही मंजूर… गरजू विद्यार्थीही उपलब्ध… अशी सर्व सकारात्मक परिस्थिती असतानाही जिल्हा परिषदेच्या एका शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांवर केवळ एकाच वर्गामध्ये शिकण्याची वेळ आली असून, या सर्व विद्यार्थ्यांना अवघा एक शिक्षक शिकवत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. इगतपुरी तालुक्यातील समनेरे गावातील हे विदारक वास्तव भूमिपुत्र फाउंडेशनने समोर आणले आहे.

इगतपुरी तालुक्यातील समनेरे गावामध्ये पहिली ते आठवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. शाळेसाठी जि.प.ची भव्य इमारत असून, लायन्स क्लबनेदेखील दुमजली इमारत बांधून दिलेली आहे. मात्र, या शाळेत इमारत आहे, विद्यार्थी आहे परंतु त्यांना शिकविण्यासाठी शिक्षकच नाहीत, अशी भयाण परिस्थिती समोर आली आहे. पहिली ते आठवीचे आठही वर्ग एकाच खोलीत भरविले जात असून, या सर्व वर्गांतील विद्यार्थ्यांना अवघी एकच शिक्षिका गेल्या वर्षभरापासून शिकवित आहेत. त्याचा परिणाम असा की, शाळेतील ८० टक्के मुलांना अद्यापही आपल्या मातृभाषेचेसुद्धा ज्ञान अवगत झालेले नाही. अनेक विद्यार्थ्यांना साधे मराठीदेखील वाचता येत नाही. बड्या पुढाऱ्यांचे गाव म्हणून ओळख असलेल्या या गावातील जि.प. शाळेचे विदारक चित्र पाहून अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे एका वर्गासाठी एक शिक्षक अशी व्यवस्था असताना दुसरीकडे सर्व विद्यार्थ्यांना एकाच वर्गात आणि केवळ एकाच शिक्षकाकडून शिकण्याची वेळ येणे, ही बाब नक्कीच संतापजनक असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. एकाच वर्गामध्ये आठ वर्ग भरविले जात असतील, तर शेतकऱ्यांची मुले प्रगती कशी करणार, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत असून, या मुलांचे भविष्य अंधारातच जाणार, हेदेखील यातून स्पष्ट होत आहे.

राज्यात असंख्य मुले-मुली डीएड, बीएड झालेले आहेत. त्यापैकी काही खासगी शाळांमध्ये तुटपुंज्या वेतनावर शिक्षक आहेत, काही खासगी शिकवण्या घेतात, तर काही बेरोजगार आहेत. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शिक्षक भरती करून जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारावा. जनतेला शिक्षण आणि आरोग्य मोफत द्या, दुसरे काही नको. धनदांडग्यांनी त्यांची मुले जि.प. शाळेतून काढून खासगी शाळांमध्ये टाकली आहेत, जि.प. शिक्षकांची मुलेदेखील कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकत आहेत. मात्र गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना जि.प. शाळाच आधार आहेत. त्यामुळे राजकीय नेते, सरकारी अधिकाऱ्यांच्या मुलांना जि.प. शाळांमध्ये शिक्षण सक्तीचे केले, तरच ही गरीब-श्रीमंतीची ही दरी कमी होऊन जि.प. शाळांचा दर्जा सुधारेल. – विनोद नाठे, संस्थापक अध्यक्ष, भूमिपुत्र फाउंडेशन

जिल्हा परिषद दखल घेणार?

भूमिपुत्र फाउंडेशनने या विषयाला वाचा फाडली असून, यासदंर्भात तयार केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. चार दिवसांतच तब्बल ४० लाख लोकांनी हा व्हिडिओ बघितला असून, साडेआठ हजार नेटकऱ्यांनी शेअर केला. साडेनऊ हजार नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या असून, एक लाखापेक्षा जास्त लाइक आहेत. असे असले, तरी नाशिक जिल्हा परिषद प्रशासन मात्र यासंदर्भात कधी दखल घेणार, असा प्रश्न आहे.

संबंधित शाळेसाठी चार पदे मंजूर आहेत. सध्या दोन शिक्षक कार्यरत असून, अन्य दोन शिक्षकांचीही तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक केली आहे. तसेच, दोन महिन्यांत दोन शिक्षकांची कायमस्वरूपी नेमणूक केली जाणार आहे. तसेच, यासंदर्भात समिती स्थापन करून सखोल चौकशी केली जाईल. – भगवान फुलारी, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT