लंडन : झिका विषाणूने जगभरातील अनेक देशांमध्ये चिंता निर्माण केलेली आहे. मात्र हा विषाणू कर्करोगासारख्या गंभीर आजारात एक हत्यार म्हणून वापरता येऊ शकतो असे दिसून आले आहे. 'काट्याने काटा काढावा' अशा न्यायाने त्याचा हा वापर करता येईल, असे वैज्ञानिकांना वाटते. हा विषाणू मानवामधील न्युरोब्लास्टोमा ट्युमरवर हल्ला चढवून त्यांना नष्ट करू शकतो असे उंदरांवरील प्रयोगात आढळून आले आहे. अर्थात माणसामध्ये त्याचा उपचारासाठी कसा वापर करता येईल हे अद्याप अस्पष्टच आहे.
झिका विषाणूचा शोध 1947 मध्येच लावण्यात आला होता. त्यावेळेपासूनच या विषाणूच्या मानवी शरीरातील संक्रमणाची माहिती विज्ञानाला होती, मात्र आता आणखी एका वेगळ्या शत्रूविरुद्ध लढण्यासाठी त्याचा खुबीने वापर करता येऊ शकतो, असा शोध वैज्ञािनिकांना लागला आहे. कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी हा विषाणू उपयुक्त ठरू शकतो. याबाबतच्या संशोधनाची माहिती 'कॅन्सर रिसर्च कम्युनिकेशन्स' या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
संशोधकांनी याबाबतच्या प्रयोगासाठी अशा उंदराचा वापर केला ज्यामध्ये मानवातील न्यूरोब्लास्टोमा ट्युमरच्या पेशी प्रत्यारोपित केल्या होत्या. हा कर्करोग एक प्रकारचा चेतापेशींचा कर्करोग आहे. उंदरांमधील असा ट्युमर त्यांच्यामध्ये झिका विषाणू सोडताच तात्काळ नष्ट झाल्याचे दिसून आले. शिवाय हे उंदीर दीर्घकाळ जगले. अमेरिकेच्या फ्लोरिडामधील ऑरलँडो येथील नेमर्स चिल्ड्रेन हॉस्पिटलमधील जोसेफ मझार या वैज्ञािनिकाने याबाबतची माहिती दिली. या प्रयोगातून 80 ते 90 टक्क्यांपर्यंत परिणाम होत असल्याचे आम्हाला दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. केवळ एकाच इंजेक्शनमुळे ट्युमर नष्ट झाल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र मानवावर हे तंत्र कसे वापरता येईल हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचेही त्यांनी सांगितले.