राहुल हातोले
पिंपरी : सुरक्षित आणि खात्रीशीर प्रवासी सेवा म्हटले की, डोळ्यासमोर राज्य परिवहनची एस.टी. बस डोळ्यासमोर येते. विनाअपघात सेवा देणार्या सेवेत एस.टी. प्रथम स्थानी येते. परंतु काही वर्षांपासून महामंडळाच्या काही चालकांकडून बेदरकार पद्धतीने होणार्या ड्रायव्हिंगमुळे अपघातांची संख्या वाढत आहे. वल्लभनगर आगारातील चालकांकडून गेल्या 25 वर्षांत 175 अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, याच आगारातील इस्माईल भिकानखान पठाण या चालकाने आपल्या 28 वर्षाच्या सेवा काळात एकही अपघात होऊ न देता, प्रवाशांना वेळेवर, उत्तम आणि चोख सेवा बजावली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चालकांकडून राज्य परिवहन बसेसचे अपघात टाळण्यासाठी विना अपघात सेवा दिली जावी म्हणून प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने गेल्या 25 वर्षात किंवा त्याहून जास्त कालावधीत विनाअपघात सेवा देणार्या चालकांना रोख बक्षिस, तसेच सपत्नीक सत्कार केला जातो. अशा चालकांना 25 हजार रूपयांचे बक्षीस, सन्मानपत्र, 25 वर्ष विना अपघात सेवेचा बिल्ला, स्मृतिचिन्ह आणि चालकांच्या पत्नीसाठी खण-साडी देऊन नुकताच सत्कार केला गेला.
या अंतर्गत राज्यातील एकूण 780 चालकांपैकी पुणे विभागातील 42 चालकांची निवड झाली होती. यामध्ये वल्लभनगर आगारातील दोन तर, तळेगाव दाभाडे आगारातील एका चालकाचा समावेश होता. वल्लभनगर आगारातील दोन्ही चालक सेवानिवृत्त झाले. यापैकी पहिले चालक शहाजी कांबळे यांचे निधन झाले तर दुसरे ईस्माईल भिकानखान पठाण हे आहेत. यांचा सत्कार त्यांच्या पत्नी हसीना पठाण यांच्यासह पुणे विभागात करण्यात आला. तसेच तळेगाव दाभाडे आगारातील चालक हे अजून कार्यरत असून त्यांचे नाव कैलाश शेळके आहे.
इस्माईल पठाण यांचे वय 63 असून, त्यांनी परिवहन महामंडळात 28 वर्षे सेवा दिली. ते 1989 मध्ये मुंबई डेपोमध्ये रूजू झाले होते. त्यानंतर पुणे विभागात बदली झाली. वल्लभनगर आगारात 2003 पासून 30 सप्टेंबर 2017 पर्यंत सेवा दिली. अशा एकूण 28 वर्षांच्या सेवा काळात कुठलाच किरकोळ अथवा गंभीर अपघात झाला नाही.
गेल्या 25 वर्षात पिंपरी-चिंचवड आगारातील सरासरी अपघात
अपघातांचे प्रकार
किरकोळ 70
गंभीर 94
प्राणांतिक 11
एकूण 175
मी वाहन चालविताना घरातील छोट्या मोठ्या अडचणी दूर ठेवायचो. गाडीतील 50 प्रवाशी हे माझे कुटुंब समजून, सावध पवित्रा घेत मी वाहन चालवित होतो. 'मनाचा ब्रेक हाच उत्तम बे्रक' असतो याची जाण मला होती. अनेकदा दोन पाळींमध्ये काम केले तरी देखील अपघात होऊ दिला नाही. माझ्या कुटुंबानेदेखील माझ्या सेवेचे गांभीर्य ओळखत मला साथ दिली.
– ईस्माईल भिकानखान पठाण, निवृत्त चालक, वल्लभनगर आगार.प्रत्येक चालकाने आपल्या गाडीचा अपघात होऊ नये, यासाठी विशेष काळजी घ्यावी. सत्कार केलेल्या चालकांचा आदर्श घ्यावा. यासाठी आमचे समुपदेशन कार्यशाळा सुरू असतात. आगारामधून विनाअपघात सेवा देणार्या चालकांची संख्या वाढावी, यासाठी आम्ही प्रयत्न करणार.
-पल्लवी पाटील, सहाय्यक वाहतूक अधीक्षक, वल्लभनगर आगार.