मालवण/मुरगूड : मालवण-तारकर्ली येथील महाराष्ट्र पर्यटन केंद्रानजीकच्या समुद्रात आदित्य पांडुरंग पाटील (वय 23, रा. बस्तवडे, ता. कागल) हा युवक बुडून बेपत्ता झाला; तर अन्य तिघांना वाचविण्यात स्थानिक ग्रामस्थांना यश आले आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी 4.30 वाजता घडली.
मुरगूड येथील एका इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी, शिक्षक असा 20 जणांचा समूह शुक्रवारी सकाळी कोल्हापूर येथून कुणकेश्वर-देवगड येथे सहलीसाठी आला होता.
देवगडहून हे सर्वजण
मालवण-तारकर्ली येथील पर्यटन महामंडळाच्या पर्यटन केंद्रानजीक समुद्रात आंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरले. यातील काही विद्यार्थी पाण्याबाहेर होते; तर आठजण आंघोळ करत असताना अचानक आलेल्या लाटेत आदित्य पाटील, अजिंक्य पाटील (21) प्रसाद चौगुले, रितेश वायदंडे (रा. कौलगे, ता. कागल) हे चारजण बुडाले. यावेळी त्यांनी आरडाओरडा सुरू केला. नजीक असलेल्या स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी धाव घेतली. यात तिघाजणांना पाण्याबाहेर काढले. त्यातील अजिंक्य पाटील हा अत्यवस्थ असल्याने त्याला मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत बेपत्ता असलेल्या आदित्यचा स्थानिक मच्छीमार व स्कुबा डायव्हर यांच्या माध्यमातून शोध सुरू होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी विलास टेंबुलकर, महादेव घागरे ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले होते. याबाबतचा अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
दरम्यान, आदित्य समुद्रात बेपत्ता झाल्याने त्याच्या बस्तवडे गावात चिंतेचे सावट पसरले. ऐन दिवाळीच्या सणातच त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.