Latest

निमगाव केतकी: कारच्या समोरासमोर झालेल्या धडकेत इंदापूरमधील २३ वर्षीय युवक ठार

अमृता चौगुले

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा

इंदापूर-बारामती राज्य महामार्गावरील निमगाव केतकी नजीक दोन चार चाकीच्या वाहनांच्या समोरासमोर झालेल्या धडकेत इंदापूर शहरातील २३ वर्षीय युवक जागीच ठार झाला, तर दोन जण जखमी झाले आहेत. अजहर मुक्तार पठाण असे या अपघातात मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.

निमगाव बाजूकडील हेगडे वस्तीच्या डाव्या बाजूला मंगळवारी ७ जूनला ह्युंदाई सॅन्ट्रो आणि टाटा टियागो या चारचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत इंदापूर शहरातील ठेकेदार मुख्तार पठाण यांच्या सिव्हील इंजिनियर असलेल्या मोठ्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर या अपघातात दोघे जण जखमी झाले आहेत. अझहर मुख्तार पठाण (वय २३, रा. ४० फुटी रोड, दर्गाह मस्जिद चौक, शिवशंभो मंदिरासमोर, इंदापूर) असे या अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. टाटा टियागोच्या अनोळखी चालकाविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अझहर पठाण हा आपले मामा समीर अब्दुलभाई मुलाणी, मावशी सायरा मुसा खान, मावस बहीण सलोनी मुसा खान व मावस भाऊ आफताब मुसा खान यांच्याबरोबर ह्युंदाई कंपनीच्या सँट्रो (एमएच ४२ एएक्स ५७९८) गाडीतून इंदापूरच्या दिशेने निघाला होता. दरम्यान निमगावच्या दिशेने अतिवेगात निघालेल्या टाटा टियागोने (एमएच १३ डीटी ४१२२) चुकीच्या दिशेला जात समीर मुलाणी चालवत असलेल्या सॅन्ट्रोला गाडीच्या ड्रायव्हर सिटच्या पाठीमागील बाजूस जोरदार धडक दिली. त्यामुळे ड्रायव्हरच्या पाठीमागे बसलेल्या अझहर पठाण याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. ही धडक इतकी जोरदार होती की, टियागो ७० फुटांपेक्षा जास्त अंतरावर उजव्या बाजूने असलेल्या झुडूपांमध्ये जाऊन अडकली. टीयागो गाडीचा वेग १२० किमी प्रती तास असावा, असा अंदाज प्रत्यक्षदर्शिंनी वर्तवला.

अझहर हा उच्चशिक्षित आणि होतकरू तरुण होता. त्याने सिव्हील इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेतले होते. त्याला नुकताच पुण्यातील एका कंपनीत जॉब लागला होता. पुढील तीन दिवसांत तो कामावर हजर होणार होता, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे. अझहरवर काळाने अचानक घाला घातल्याने त्याच्या कुटुंबीयांसाठी खूप मोठा धक्का बसला असून, त्याच्या अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT