पुढारी ऑनलाईन डेस्क : WTC Final : भारतीय क्रिकेट संघ लंडनमधील ओव्हल स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. ही कसोटी 7 जूनपासून सुरू होत आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला एक मोठा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. त्यामुळे चाहत्यांच्या नजरा त्याच्याकडे लागल्या आहेत.
रोहित शर्मा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही (WTC Final) मोठा विक्रम करू शकतो. या सामन्यात रोहितने 27 धावा केल्या तर तो 13 हजार धावा करणारा भारतीय क्रिकेट इतिहासातील तिसरा सलामीवीर ठरेल. त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 12973 धावा जमा आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीला येत 13 हजार धावा करणा-या फलंदाजांमध्ये भारताचे फक्त दोनच फलंदाज आहेत. यात क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांनाच ही किमया जमली आहे. आता रोहित शर्मा 13 हजार धावांचा मोठा आकडा गाठणारा तिसरा फलंदाज ठरू शकतो. सेहवागच्या नावावर सलामीवीर फलंदाजी करताना 15758 आंतरराष्ट्रीय धावा आहेत. तर सचिनच्या नावावर 15335 धावा जमा आहेत. रोहितला सचिन आणि सेहवागच्या क्लबमध्ये सामील होण्याची सुवर्ण संधी आहे.
वीरेंद्र सेहवाग : 15758 धावा
सचिन तेंडुलकर : 15335 धावा
रोहित शर्मा : 12973 धावा
सुनील गावसकर : 12258 धावा
शिखर धवन : 10867 धावा