वॉशिंग्टन : अमेरिकन यूट्यूबर मॅथ्यू बीम याने जगातील सर्वात मोठा आयफोन बनवल्याचा दावा केला आहे. त्याची लांबी सात फूट आहे. विशेष म्हणजे, आकाराने इतका मोठा असूनही हा आयफोन मूळ आयफोनसारखाच काम करू शकतो, असेही त्याने म्हटले आहे.
मॅथ्यूने सांगितले, मला तंत्रज्ञानाची आवड आहे आणि मी यूट्यूबवर काही सर्वात मोठे बिल्ड बनवले आहेत. आपल्याच कौशल्याची परीक्षा घेण्यासाठी मी हा जगातील सर्वात मोठा आणि क्रियाशील असा आयफोन बनवण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी 2020 मध्ये यूट्यूबर 'झेडएचसी'ने जगातील सर्वात मोठा आयफोन बनवल्याचा दावा केला होता. त्याची लांबी सहा फूट होती. अर्थात, सध्या अधिकृतपणे 'आयफोन 14 प्रो मॅक्स' हा सर्वात मोठा आयफोन आहे. त्याची लांबी 6.33 इंच आहे. मॅथ्यू आणि त्याच्या टीमने टच स्क्रिन असलेल्या टीव्हीलाच सात फूट लांबीच्या आयफोनचा डिस्प्ले बनवला आहे. त्याला मॅक मिनीसह असेंबल करण्यात आले आहे. मूळ आयफोनप्रमाणेच त्याचे साईड आणि बॅक पॅनेल डिझाईन केले आहे.
त्यामध्ये मॅट फिनिश देण्यात आले आहे. तसेच त्यामध्ये लॉक, व्हॉल्यूम अप-डाऊन बटण आणि म्यूट बटण देण्यात आले आहेत, जे कामही करतात. सात फुटांचा आयफोन रेग्युलर आयफोनप्रमाणेच काम करतो. यूट्यूबर मॅथ्यूने या फोनमध्येही कशा प्रकारे अलार्म सेट करणे, सर्व अॅप्सचा वापर करणे, अॅपल पेच्या माध्यमातून पेमेंट करणे अशी सर्वसामान्य सर्व आयफोनचे फिचर्स वापरता येऊ शकतात हे दाखवले. विशेष म्हणजे, यूट्यूबरने या फोनने सेल्फीही टिपला आणि व्हिडीओ कॉलही करून दाखवला.