बँकॉक : जगातील सर्वात मोठी सोन्याची मूर्ती थायलंडमधील बँकॉक येथे आहे. 'द गोल्डन बुद्धा' या नावाने ही सोन्याची मूर्ती ओळखली जाते. आश्चर्य म्हणजे ही मूर्ती थोडीथोडकी नव्हे तर चक्क साडेपाच हजार किलो सोन्यात मढवली गेली आहे.
भगवान बुद्धाची ही मूर्ती थायलंडची राजधानी बँकॉकमधील ट्रेमीट मंदिरात स्थित आहे. 'द गोल्डन बुद्धा' नावाने ओळखली जाणारी ही मूर्ती 9.8 फूट उंच आहे. त्याचे वजन साडेपाच हजार किलोंपेक्षाही अधिक आहे. या मूर्तीतील सोन्याची मोजदाद करायची झाल्यास ती चक्क 19 अब्ज रुपयांच्या आसपास होऊ शकते.
आणखी एक आश्चर्यकारक बाब म्हणजे ही मूर्ती कित्येक वर्षांपासून लुप्त होती. 1954 पर्यंत या सोन्याच्या मूर्तीबाबत कोणालाच काहीही कल्पना नव्हती. ही मूर्ती पूर्ण सोन्याची आहे, याचा नंतरही बराच काळ उलगडा झाला नव्हता. आता याचे कारण हे होते की, त्यावेळी या मूर्तीवर प्लॅस्टरचा हात देण्यात आला होता.
ही मूर्ती सोन्याची आहे, ते कसे कळाले, हा किस्साही रंजक आहे. 1955 मध्ये ही मूर्ती मंदिरात स्थापित करण्यासाठी आणली जात असताना अचानक ती जमिनीवर आदळली आणि यामुळे मूर्तीचे प्लॅस्टर उखडले गेले. त्यानंतरचे द़ृश्य थक्क करणारे होते. कारण, सुवर्णझळाळीने चकाकणारी इतकी सुंदर मूर्ती त्यापूर्वी कुठेच पाहण्यात नव्हती. काही वर्षांनंतर पुढे ट्रेमिट मंदिर उभारण्यात आले, जेणेकरून मूर्तीला कडेकोट सुरक्षेत ठेवता येईल. इतिहासकारांच्या मते, या मूर्तीची चोरी होऊ नये, यासाठी त्यावर प्लॅस्टर चढवण्यात आले होते.