पुढारी ऑनलाईन डेस्क : World Cup IND vs PAK: आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात 14 ऑक्टोबर रोजी महामुकाबला रंगणार आहे. संपूर्ण स्पर्धेतील हा सर्वात मोठा सामना असून जगभरातील चाहते त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
या जागतिक स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध खेळताना टीम इंडियाच्या अनेक फलंदाजांनी आपल्या दमदार खेळीने मैदान गाजवले आहे. यात सर्वात मोठी इनिंग खेळण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. रोहितने वर्ल्ड कप 2019 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 113 चेंडूत नाबाद 140 धावांची वादळी खेळी साकारली होती. (World Cup IND vs PAK)
रोहितच्या आधी भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने आपल्या विध्वंसक फलंदाजीने पाकिस्तानविरुद्ध धुमाकूळ घातला होता. त्याने 2015 च्या विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध 126 चेंडूत 107 धावांची दमदार खेळी साकारली होती. (World Cup IND vs PAK)
2003 च्या विश्वचषकात सचिन तेंडुलकर विश्वचषकाच्या करिअरमधील त्याची सर्वोत्तम खेळी केली. त्याची पाकिस्तानविरुद्धची 98 धावांची खेळी कोण विसरू शकेल? त्या सामन्यात मास्टर ब्लास्टरचे शतक अवघ्या दोन धावांनी हुकले. त्यामुळे सारेच चाहते हळहळले. पण पाकिस्तानला पराभवाची धुळ चारणारी ती खेळी ऐतिहासिक ठरली. (World Cup IND vs PAK)
भारताचा माजी सलामीवीर फलंदाज नवज्योत सिंग सिद्धूनेही पाकविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात धमाकेदार कामगिरी केली आहे. 1996 च्या विश्वचषकात त्याने 115 चेंडूत 93 धावांची खेळी खेळून धमाका केला होता.
2011 च्या विश्वचषकात मास्टर ब्लास्टरने पुन्हा एकदा आपल्या बॅटचा तडखा पाकिस्तानला दिला. सचिनने पाकिस्तानविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये दमदार फलंदाजी करताना 115 चेंडूत 85 धावांची खेळी केली. त्यामुळे पुन्हा एकदा सचिनच्या त्या खेळीने टीम इंडियाला विजय मिळवून देण्याची मोठी भूमिका बजावली.