पुढारी ऑनलाईन डेस्क :
२ एप्रिल २०११ ही तारीख देशातील क्रिकेटप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरली हाेती.या दिवशी तब्बल २८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतीय क्रिकेटमधील एक सुर्वण पान लिहलं गेलं. १९८३मध्ये भारतीय क्रिकेट संघाने कपिलदेव यांच्या नेतृत्वाखाली प्रथम वर्ल्ड कप जिंकला होता. यानंतर महेंद्रसिंह धोनी यांच्या नेतृत्वाखालील टीमने श्रीलंका संघाचा पराभव करत इतिहासाची पुनरावृती करत विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. ( World Cup 2011 ) २०११ क्रिकेट वर्ल्ड कपचे आयोजन भारत, बांगलादेश आणि श्रीलंकेने केले होते. तीन देशांमधील एकुण १३ मैदानावर या स्पर्धेतील सामने झाले हाेते. जाणून घेवूया, २०११ क्रिकेट वर्ल्ड कपमधील काही खास क्षण…
२०११ क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत एकुण १४ देश सहभागी झाले होते. दोन ग्रुप करण्यात आले. ग्रुप 'ए'मध्ये ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, पाकिस्तान,
न्यूझीलंड, झिम्बाबे, कॅनडा आणि केनिया संघ होते. तर ग्रुप 'बी'मध्ये भारतीय संघ होता. भारतीय संघासमोर इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, वेस्टइंडीज अशा बलाढ्य संघांचे आव्हान होते.वर्ल्ड कपमध्ये एकुण ४९ सामने खेळले गेले. आजवरच्या विश्वचषक स्पर्धेतील हे सर्वाधिक सामने ठरले.
या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू होण्याचा बहुमान युवराजसिंगला मिळाला होता. तो मॅन ऑफ दी टूर्नामेंट ठरला. भारतासाठी सर्वाधिक धाव करणारा या स्पर्धेतील तो चौथा खेळाडू होता. युवराज सिंग याच्यापेक्षा सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, आणि महेंद्रसिंह धोनी यांच्या नावावर सर्वाधिक धावा होत्या. मात्र युवराजसिंग हा धावांबरोबर सर्वाधिक बळी घेणारा दुसरा खेळाडू ठरला होता. सर्वाधिक बळी घेण्याची कामगिरी भारताचा वेगवान गोलंदाज झहीर खानने केली होती.
साखळी सामन्यांमध्ये विराट कोहलीने तीन वेळा अत्यंत कठीण परिस्थितीत फलंदाजी केली होती. विराटने या स्पर्धेत आपली पुढील वाटचाल स्पष्ट केली होती. या स्पर्धेत विराटने स्वत:ला सिद्ध केले. सचिन तेंडुलकर हा १९९२ते २०११ या कालावधीत एकुण सहा वर्ल्ड कप खेळला. अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू ठरला होता.
२०११ च्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशान याने केल्या. त्याने तब्बल ५०० धावा केल्या. सचिन तेंडुलकर आणि कुमार संघकारा यांनी अनुक्रमे ४८२ आणि ४६५ धावा केल्या. तर सर्वाधिक बळी हे भारताच्या झहीर खान आणि शाहिद अफ्रिदी यांनी प्रत्येकी २१ विकेट घेतल्या. न्यूझीलंडच्या टीम साऊदी आणि भारताच्या युवराजसिंग याने अनुक्रमे १८ आणि १५ बळी घेतले होते. या स्पर्धेच्या सुरुवातीपासून भारतीय फलंदाज सर्वाधिक धावा करतील, असा अंदाज व्यक्त केला जात हाेता. मात्र ही कामगिरी श्रीलंकेच्या क्रिकेटपटू तिलकरत्ने दिलशान याने केली.
भारताने उपांत्य फेरीत पाकिस्तानचा २९ धावांनी पराभव केला होता. भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याने एका मुलाखीमध्ये या सामन्याबाबत माहिती देताना सांगितले होते की, टीम इंडियासाठी या स्पर्धेतील पाकिस्तानविरोधातील उपांत्य सामना सर्वात महत्त्वपूर्ण होता. दोन्ही देशांचे पंतप्रधान सामना पाहण्यासाठी आले होते. प्रचंड सुरक्षा व्यवस्था होती. यामुळे खेळाडूंसाठी जेवण वेळेवर पोहचू शकले नाही. संपूर्ण संघ हा जेवण न करतातच मैदानावर उतरला होता. यावेळी सचिन तेंडुलकर याने आपल्या सहकार्यांना सूचना केली होती की," येथे जेवण कोण करणार?, फळ किंवा जे उपलब्ध आहे ते खावून घ्या, आपल्याला पाकिस्तानला हरवायचे आहे". सचिनचा हा सल्ला टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूने मानला. भारताने पाकिस्तानवर दिमाखदार विजय मिळवला.
अंतिम सामन्यात गौतम गंभीर याने अविस्मरणीय फलंदाजी केली. तर कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने उत्तुंग षटकार खेचत २८ वर्षानंतर पुन्हा एकदा क्रिकेट वर्ल्ड कपवर टीम इंडियाचे नाव कोरलं होतं.
स्पर्धेचे एकुण बक्षीस ७५.९५ कोटी रुपये होते. विजेत्या संघाला २२.७८ दर उपविजेत्या संघाला ११.३९ कोटी रुपये दिले गेले होते. आपल्या भूमीवर स्पर्धेचे आयोजन करत वर्ल्ड कप जिंकणारा भारत पहिला देश ठरला होता. टीम इंडिया या स्पर्धेत अजिंक्य ठरल्यानंतर बीसीसीआयने प्रत्येक खेळाडूला दोन कोटी रुपये बक्षीस रुपात दिले. तर सपोर्ट स्टाफमधील प्रत्येकला ५०लाख रुपये देण्यात आले होते.
हेही वाचलं का?