काकामिघारा; वृत्तसंस्था : सुनेलिता टोप्पो हिच्या एकमेव मैदानी गोलच्या जोरावर भारताने महिला ज्युनिअर आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये जपानला 1-0 असा धक्का देत अंतिम फेरीत प्रवेश केला. या विजयाबरोबरच ज्युनिअर वर्ल्डकप हॉकी स्पर्धेची पात्रता मिळवली. ही विश्वचषक स्पर्धा 29 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या काळात सँटियागो येथे होणार आहे. (Women Junior Asia Cup 2023)
भारतीय महिला संघ 2012 नंतर दुसर्यांदा ज्युनिअर आशिया चषक स्पर्धेत फायनल गाठली आहे. सामन्याचे पहिले तिन्ही क्वार्टर गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतर सुनेलिताने 47 व्या मिनिटाला मैदानी गोल नोंदवला. हाच या सामन्याचा निर्णायक गोल ठरला. भारताचा अंतिम सामना आज (रविवारी) चीन किंवा कोरिया यापैकी एका संघाविरुद्ध होणार आहे. (Women Junior Asia Cup 2023)
भारताने या सामन्यात आक्रमक सुरुवात केली आणि चेंडूवर जास्तीत जास्त आपले वर्चस्व ठेवले. त्यामुळे चेंडू जपानी गोलपोस्टच्या जवळच फिरत राहिला; परंतु सुरुवातीच्या दबावानंतर जपानने सामन्यात पुनरागमन केले. त्यांनी पहिल्या क्वार्टरच्या शेवटच्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवला; परंतु भारताची गोलकिपर माधुरी किंडो हिने हा फटका सहज अडवला. यानंतर जपानला लगेच दुसरी पेनल्टी मिळाली; परंतु हा फटका गोलपोस्टच्या खूप लांबून गेला.
दुसर्या सत्राच्या तिसर्या मिनिटाला जपानला आणखी एक पेनल्टी मिळाली; परंतु माधुरीने पुन्हा एकदा चांगला बचाव केला. मध्यंतरानंतर जपानने आक्रमक धोरण अवलंबले; परंतु त्यांना गोल करता आला नाही. 39 व्या मिनिटाला भारताकडे आघाडी घेण्याची सुवर्णसंधी होती; परंतु अनुराधाला पेनल्टीला गोलमध्ये रुपांतर करता आले नाही. त्यानंतर पुन्हा दुसर्या पेनल्टीवरही भारताला अपयश आले. शेवटी चौथ्या सत्रात ही गोलकोंडी फुटली आणि भारताने 1-0 अशी आघाडी मिळवली. सामन्याच्या अंतिम मिनिटाला माधुरीने जपानच्या एका फटक्याला अडवून भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा केला.
हेही वाचा;