केळघर; पुढारी वृत्तसेवा : जावली तालुक्यातील जनता हीच माझी ताकद आहे. या जनतेचे पाठबळ व आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्याने मला निवडणुकांमध्ये कोणत्याही आव्हानांची भीती नाही, असा इशाराच आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी विरोधकांना दिला.
गाढवली पुनर्वसन (ता. जावळी) येथे प्राथमिक शाळा व मंदिर परिसरातील संरक्षण भिंतीच्या कामांचे भूमिपूजन आ.भोसले यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास सरपंच बबनराव शिंदे, प्रकाश शिंदे, सुनील नाना जांभळे, सागर धनावडे, विनोद माने, जानू माने, प्रवीण पाटणे, विक्रांत धनावडे आदींची उपस्थिती होती.
आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, जावलीतील जनतेने माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. या प्रेमातून उतराई होण्यासाठी रखडलेली कामे प्राधान्याने पूर्ण करत आहे. जावली तालुक्यात अतिवृष्टीमुळे रस्ते व पुलांचे नुकसान झाले आहे. तालुका हा दुर्गम व डोंगराळ असल्याने दळणवळण सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करत आहे. पुनवडी पुलाचे कामही मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करत आहे.
जावळी तालुक्यात अतिवृष्टीमुळे रस्ते व पुलांचे मोठे नुकसान झाले आहे. यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून तालुक्यातील दुर्गम गावातील दळणवळणाचा प्रश्न सोडवून लोकांची गैरसोय दूर करण्यासाठी ठोस प्रयत्न केले जातील. बबनराव शिंदे यांनी स्वागत केले. प्रकाश शिंदे यांनी आभार मानले.