प्रातिनिधिक छायाचित्र. 
Latest

पतीला सार्वजनिक ठिकाणी अपमानित करणे, स्‍त्री लंपट म्‍हणणे अत्‍यंतिक क्रूरता : उच्‍च न्‍यायालय

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कोणताही यशस्वी विवाह हा पती आणि पत्‍नी या दोघांमधील परस्पर आदर आणि विश्वास यावरच आधारीत असतो. यातील एकाने तडजोड केली तर नात्याचा शेवट अपरिहार्य आहे. कारण कोणतेही नाते अर्धसत्य, खोटे आरोप आणि अर्धवट विश्‍वासवर टिकू शकत नाही, असे स्‍पष्‍ट करत खोटे आरोप करून एखाद्या पतीचा सार्वजनिकपणे अपमान करणे आणि त्‍याला स्‍त्रीलंपट म्‍हणणे हे अत्यंत क्रूरतेचे कृत्य आहे, असे निरीक्षण नुकतेच दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) नोंदवले. तसेच पतीला काैटुंबिक न्‍यायालयाने मंजूर केलेलाघटस्फोटाचा निर्णयही कायम ठेवला असल्‍याचे 'लाईव्‍ह लॉ'ने आपल्‍या रिपोर्टमध्‍ये म्‍हटलं आहे.

एका दाम्‍पत्‍याच्‍या लग्नाला सहा वर्षांचा कालावधी झाला. त्‍यांना एक मुलगाही झाला. काही वर्षांनी पत्‍नी आपल्‍याशी क्रूरतेने वागते, असा दावा करणारी याचिका पतीने कौटुंबिक न्‍यायालयात दाखल केली होती. क्रूरतेच्या आधारे कौटुंबिक न्‍यायालयाने पतीला घटस्फोट मंजूर केला होता. या निर्णयाविरोधात पत्नीने दिल्‍ली उच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

परस्पर आदर आणि विश्वास हेच विवाहाचे मूलभूत स्‍तंभ

यावेळी खंडपीठाने स्‍पष्‍ट केले की, आदर आणि विश्वास हेच विवाहाचे दोन मूलभूत स्‍तंभ आहेत. कोणत्याही व्यक्तीने आपल्या जोडीदाराकडून अनादरपूर्ण वर्तन करुन नये. जोडीदाराच्‍या प्रतिमा आणि प्रतिष्ठेचे रक्षण केले पाहिजे. एका जोडीदाराने केलेल्या बेपर्वा, बदनामीकारक, अपमानास्पद आणि निराधार आरोपांमुळे दुसऱ्याची प्रतिमा मलिन झाली आणि ते अत्यंत क्रूरतेचे कृत्य ठरते.

पतीला सार्वजनिक ठिकाणी अपमानित करणे अत्‍यंतिक क्रूरता

या प्रकरणात पत्‍नी ही पतीला सार्वजनिक ठिकाणी अपमानित करत होती. त्‍याच्‍यावर शाब्दिक हल्ला केले गेले. ऑफिसमधील सर्व कर्मचारी आणि नातेवाईकांसमोर पतीच्‍या चारित्र्‍यावर संशय घेणारे आरोप केले. पत्‍नीने पतीच्‍या कार्यालयातील महिला कर्मचार्‍यांचाही छळ करण्यासही सुरुवात केली. पतीचा उल्‍लेख स्‍त्रीलंपट असा केला. हे वर्तन म्‍हणजे अत्यंत क्रूरतेचे कृत्य आहे, असे निरीक्षण न्‍यायालयाने नोंदवले.

…तर नात्याचा शेवट अपरिहार्य

पती इतका मानसिक त्रास आणि आघात सहन करत होता की त्याने कधीकधी आपले जीवन संपवण्याचा विचारही केला होता. कोणताही यशस्वी विवाह परस्पर आदर आणि विश्वास यावरच आधारित असतो. यातील एका बाजूने तडजोड होत असेल तर नात्याचा शेवट अपरिहार्य आहे. कारण कोणतेही नाते अर्धसत्य, अनादर आणि अर्धा विश्वासावर टिकू शकत नाही." असेही न्यायालयाने निरीक्षण केले.

आपल्‍याच मुलाला आपल्‍या विरुद्ध पाहणे पालकांसाठी अत्‍यंत दु:खदायक

या प्रकरणात मुलालाही वडिलांच्याविरोधात शस्त्र म्हणून वापरले गेले आहे. आपलेच मुल पूर्णपणे आपल्‍या विरुद्ध होताना पाहण्‍यासारखे दु:खदायक वडिलांना काहीही असू शकत नाही. मुलाच्‍या पालनपोषणात वडील कोठेही अपयशी ठरले नाहीत, असेही यावेळी न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT