Latest

space station …म्हणून स्पेस स्टेशन कधीच पृथ्वीवर कोसळत नाही

Arun Patil

वॉशिंग्टन : चांद्रयान-3 च्या यशानंतर भारताचा जगात बोलबाला झाला. भारत 2035 पर्यंत अंतराळात स्वतःचे स्पेस स्टेशन तयार करेल आणि 2040 मध्ये भारतीय अंतराळवीर चंद्रावर पाऊल ठेवतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच व्यक्त केला आहे. सध्या चीनचे तियांगाँग स्पेस स्टेशन अवकाशात असून, ते त्याची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. 2035 मध्ये आपले स्पेस स्टेशन बनवल्यानंतर भारत अंतराळ मोहिमांच्या बाबतीत जगातील अनेक देशांना मागे टाकेल. अशा परिस्थितीत स्पेस स्टेशनमध्ये काय होते, ते अंतराळात कसे टिकून राहते आणि ते कसे कार्य करते, हा प्रश्न आपल्याला अनेकदा पडतो. याचे उत्तर अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने दिले आहे.

स्पेस स्टेशन ही कृत्रिम रचना असून, ती पृथ्वीच्या कक्षेत पाठविली जाते. याद्वारे अवकाशात अनेक प्रयोग केले जातात. नवीन माहिती समोर आणली जाते. अनेक गुपिते उघड होतात. पृथ्वीवरून पाठवलेले अंतराळवीर येथे राहतात आणि प्रयोग करतात. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक धातूपासून बनलेले असते. तथापि, ते अंतराळात कसे राहते आणि ते पृथ्वीवर का पडत नाही हे जाणून घेणे आवश्यक आहे.

नासाचे फ्लाइट कंट्रोलर आणि इन्स्ट्रक्टर रॉबर्ट फ्रॉस्ट म्हणतात, स्पेस स्टेशन म्हणजे पृथ्वीभोवती फिरणारा एक चेंडूच होय. मात्र. हे स्टेशन गुरुत्वाकर्षणात असूनही पृथ्वीवर का पडत नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. येेथे हे लक्षात घेतले पाहिजे की, स्पेस स्टेशन ताशी 27600 किलोमीटर वेगाने अंतराळात फिरत असते. या वाढलेल्या वेगामुळे, एक विशेष प्रकारची शक्ती निर्माण होते आणि ती गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध कार्य करते. म्हणजेच ही शक्ती स्पेश स्टेशनला पृथ्वीच्या दिशेने पडण्यापासून रोखते. स्पेस स्टेशनला पृथ्वीपासून दूर ठेवण्याचा वेग आणि त्याला पडण्यापासून रोखणार्‍या शक्तीचा वेग समान असतो. हा समतोल सातत्याने राखला जात असल्यामुळे स्पेस स्टेशन कधीच पृथ्वीवर पडत नाही आणि अंतराळात ते टिकून राहते.

स्पेस स्टेशनमध्ये अनेक स्वयंचलित सुविधा आणि उपकरणे असतात. त्याद्वारे अंतराळवीर अंतराळात घडणार्‍या विविध घटनांची माहिती पृथ्वीवर पाठवतात. त्यात बसवलेले हायटेक कॅमेरे आणि अर्थ सेन्सर सिस्टीमच्या मदतीने ते अंतराळातील अनेक रहस्ये उलगडतात.

सध्या चीन आपल्या तियांगाँग स्पेस स्टेशनची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण, तेथे बांधण्यात आलेले आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक येत्या काही वर्षांत निवृत्त होणार आहे. तथापि, चीनचे अंतराळ स्थानक पुढील 15 वर्षे कार्यरत राहणार आहे. या अंतराळ स्थानकात जास्तीत जास्त तीन अंतराळवीर राहू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT