नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क : नाशिक महापालिकेच्यावतीने शहरात 350 एकरवर आयटी पार्क प्रस्तावित करण्यात आले आहे. याचसंदर्भात केंद्रीय लघु व सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयटी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या, आयटी हब साठीच्या बैठकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलेच शरसंधान साधले. गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मंत्रालयात गेले नाहीत, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मंत्रालयात जात नाही, कॅबिनेटमध्ये जात नाही. असा मुख्यमंत्री कधी पाहिला आहे का असा खोचक सवाल नारायण राणे यांनी यावेळी उपस्थित केला.
हिमालयाच्या उंची असलेल्या नरेंद्र मोदी यांच्याविषयी पात्रतेची भाषा करण्याची यांची पात्रता नसल्याचे नारायण राणे म्हणाले. राज्यात विकासाचे, शिक्षणाचे विषयावर चर्चा होत नाही, मराठी तरुण आज उद्ध्वस्त होतो आहे. मराठी माणूस मागे पडतो आहे. तिकडे लक्ष द्यायचे सोडून, सगळे जीवन या देशासाठी ज्या माणसाने समर्पित केले अशा माणसावर तुम्ही टिका करता असेही नारायण राणे म्हणाले.
शिवसेना ही गद्दारी करुन सत्तेवर आली. गेल्या निवडणुकीत शिवसेना भाजप युती होती म्हणून एकत्र जागावाटप झाले, निवडणुकही झाली. त्यात जनतेने सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला 105 जागांवर उमेदवार निवडून दिले. शिवसेनेला 55 जागा मिळाल्या पण शिवसेनेने गद्दारी केली असे नारायण राणे म्हणाले.
या परिषदेत नारायण राणे यांनी मोठी घोषणा केली आहे. नाशिक आयटी पार्कला मंजुरी देण्याची जबाबदारी माझी, त्यासाठी आवश्यक ती सर्व पूर्तता करुन सर्वंकष प्रस्ताव मला सादर करा, असे आवाहन राणे यांनी महापौर सतीश कुलकर्णी यांना केले. याशिवाय नाशिकसाठी अनेक महत्वाच्या बाबी त्यांनी यावेळी सांगितल्या.