Latest

प्राप्तिकर विवरण का भरायचे?

Arun Patil

आयटीआर हा कोणत्याही व्यक्तीचा नियमित उत्पन्नाचा दाखला मानला जातो. या आधारावर बँक सहजपणे कर्ज प्रदान करते. तसेच विमा कंपन्यादेखील प्राप्तिकर विवरणाशी निगडित कागदपत्रांना उत्पन्नाचा ठोस पुरावा मानते. मालमत्ता खरेदी किंवा गुंतवणुकीवर आयटीआरचा पुरावा मागितला जातो. याशिवाय परदेशात प्रवासाचे नियोजन करत असाल, तर त्या देशाचा दूतावास प्राप्तिकर विवरण दाखल करण्याचा पुरावा मागू शकतो.

एखाद्याचे उत्पन्न करसवलतीची मर्यादा ओलांडत असेल, तर त्याने आयटीआर फाईल करणे गरजेचे आहे. मात्र काही जण टाळाटाळ करतात. विशेष म्हणजे बहुतांश मंडळी प्राप्तिकर खात्याने निश्चित केलेल्या करसवलतीच्या मर्यादेपक्षा कमी उत्पन्न मिळवतात, तरीही ते आयटीआर भरतात. आपण प्राप्तिकराच्या कक्षेत नसाल, तर आयटीआर भरणे बंधनकारक नाही. मात्र आयटीआर दाखल केला तर त्यास अनेक लाभ मिळू शकतात. लक्षात ठेवा, रिटर्न भरल्याने कोणतेही नुकसान होणार नाही.

बँकेकडून सहज कर्ज उपलब्ध

आर्थिक उदारीकरणानंतर बँकांकडून गृहकर्ज घेण्याचे प्रमाण वाढले. परिणामी, आजतागायत बहुतांश मंडळी स्थावर मालमत्ता खरेदी करण्यासाठी बँकेच्या कर्जाचा आधार घेत आहेत. याशिवाय मोटार, फ्रीज, वॉशिंग मशीन, दुचाकी वाहन, वातानुकूलित यंत्रणा आदी खरेदी करण्यासाठी बँक किंवा अन्य खासगी आर्थिक संस्थांकडून कर्ज घेतले जात आहे. कर्जफेडीची क्षमता असणार्‍या व्यक्तीला बँकेकडून कर्ज प्रदान केले जाते. अर्थात, नियमित उत्पन्न असणार्‍या किंवा व्यवसायातून नियमित उत्पन्न घेणार्‍यांना बँक कर्ज देते. नियमित उत्पन्न नसणार्‍या व्यक्तीला बँकेकडून कर्ज दिले जात नाही. आयटीआर हा कोणत्याही व्यक्तीचा नियमित उत्पन्नाचा दाखला मानला जातो. या आधारावर बँक सहजपणे कर्ज प्रदान करते. म्हणूनच कर्जासाठी अर्ज केला तर बँकेकडून तीन वर्षांचे प्राप्तिकर विवरण मागितले जाते. आयटीआर विवरण पाहताच, बँकेकडून कर्जाची फाईल तत्काळ पुढे सरकते. एखादा मोठा व्यावसायिक हा आयटीआर भरत नसेल तर बँकेला त्याच्या उत्पन्नाची खबर कोणत्या आधारावर लागेल? अशा वेळी त्या व्यक्तीचा कितीही आलिशान बंगला असला, कितीही बँक बॅलन्स असला तरी बँक त्यास कर्ज देणार नाही.

विमा कवच आणि दावा

एखादा व्यक्ती मोठ्या विमा कवचसाठी प्लॅन खरेदी करू इच्छित असेल, तर विमा कंपन्यांकडूनदेखील वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र मागितले जाते. नोकरदार वर्ग हा प्राप्तिकर विवरणपत्र किंवा सॅलरी स्लीपच्या मदतीने विमा योजना घेऊ शकतो. जोपर्यंत आयटीआरची प्रत विमा कंपनीकडे जमा होत नाही, तोपर्यंत व्यावसायिकाचा विमा उतरवला जात नाही. विमा कंपन्या देखील प्राप्तिकर विवरणाशी निगडित कागदपत्रांना उत्पन्नाचा ठोस पुरावा मानते.

उदा. एखाद्या रस्ते अपघातात व्यक्तीचा मृत्यू झाला, तर मृताचे नातेवाईक भरपाईसाठी न्यायालयात जातात. अशा वेळी मृत व्यक्तीने आयटीआर विवरण तपासले जाते. या आधारावर त्याच्या वार्षिक उत्पन्नाचे आकलन करतात आणि त्यानुसार निघालेल्या रकमेच्या दहापट रक्कम मृताच्या नातेवाइकास देतात. म्हणजे वार्षिक उत्पन्न सरासरी दहा लाख असेल, तर मृताच्या नातेवाइकांना एक कोटी रुपयांपर्यंत मोबदला मिळेल. मात्र त्याने आयटीआर भरला नसता, तर न्यायालय एखादी रक्कम निश्चित करून प्रकरण निकाली काढते.

निविदा, व्हिसात आयटीआरची गरज

एखादी व्यक्ती सरकारी किंवा खासगी कंपनीकडून निविदा मिळवत असेल, तर त्याला आयटीआर रिटर्नचे प्रमाणपत्र दाखल करावे लागते. संबंधित व्यक्ती प्रमाणपत्र सादर करत नसेल, तर निविदा प्रक्रियेत अडथळे येतात आणि ती निविदा अन्य व्यक्ती किंवा कंपनीच्या नावे काढली जातात. याशिवाय परदेशात प्रवासाचे नियोजन करत असाल, तर त्या देशाचा दूतावास प्राप्तिकर विवरण दाखल करण्याचा पुरावा मागू शकतो. एखादा व्यक्ती रोखीने किंवा बँकेच्या माध्यमातून चलनाचा व्यवहार करत असेल, तर आयटीआरमुळे त्याला व्यवहारात अडचणी येत नाही. मालमत्ता खरेदी किंवा गुंतवणुकीवर आयटीआरचा पुरावा मागितला जातो.

प्रसाद पाटील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT