Latest

लवंगी मिरची : होर्डिंग की दरड?

backup backup

मला एक सांग मित्रा, आजचे युगे जाहिरातीचे युग आहे. बहुत्येक जाहिराती मोबाईल स्क्रीनवर पाहिल्या जातात; पण मग हे भले मोठे होर्डिंग का लावले जातात? म्हणजे त्याचा नेमका काय उपयोग होतो मला अजून तरी समजलेले नाही. परवाच पुण्यामध्ये होर्डिंग कोसळल्यामुळे काही लोक मृत्युमुखी पडले. मग असे होर्डिंग लावायचेच कशाला?

हे बघ, होर्डिंग म्हणजे फलक लावून जाहिरात करण्यामध्ये आपला देश टॉपवर आहे, हे नक्की. नुसते होर्डिंग अंगावर कोसळूनच मृत्यू होतात, असे नाही बरेचदा वाहन चालवणारे लोक या होर्डिंगकडे पाहत पाहतसुद्धा एकमेकांना धडकतात कारण या होर्डिंगवर असलेल्या ललना या अतिसुंदर आणि चित्तवेधक असतात. जाहिरात करणार्‍याला माहीत असते की, या फलकावर सुंदर स्त्री असेल, तर जाणारा-येणारा एक कटाक्ष तरी कमीत कमी टाकतोच. प्रश्न तो नाहीये, मूळ समस्या ही आहे की, ज्याला जिथे वाटेल तिथे आपल्या व्यवसायाचे, उत्पादनाचे होर्डिंग लावण्याची हौस आहे. महानगरपालिका यावर नियंत्रण ठेवून असतात. मनपाने परवानगी दिल्याखेरीज कुणालाही कुठेही होर्डिंग लावता येत नाही. शिवाय ते लावल्यानंतर किती दिवसात काढायचे याचेही नियम ठरलेले असतात; पण सहसा कोणी लक्ष देत नाही आणि नवीन होर्डिंग त्या जागेवर येईपर्यंत जुने होर्डिंग आणि त्याचा लोखंडी ढाचा जसाच्या तसा महिनोनमहिने त्या जागेवर झळकत असतो. कमी खर्चात केलेला असा ढाच्या ऊन, पाऊस, वारा यांचा फारसा मुकाबला करू शकत नाही आणि मग तो एकाएकी कोसळतो. पुण्यातील घटनेमध्ये असेच घडले. पाऊस पडत होता आणि त्यापासून संरक्षण व्हावे म्हणून काही श्रमिक कामगार त्या होर्डिंगच्या आश्रयाला गेले आणि त्याच होर्डिंगने त्यांचा प्राण घेतला.

म्हणजे जाहिरात क्षेत्राने आता चक्क लोकांचे प्राण घ्यायला पण सुरुवात केली आहे. सातत्याने फोन करून, वर्तमानपत्रांमध्ये पोम्प्लेट टाकून, टीव्हीवर जाहिराती टाकून यांचे पोट भरले नाही म्हणून मग लोकांचा जीव घेणे सुरू झाले आहे. कोणतेही मोठे होर्डिंग बघ, विशेषतः ते एखाद्या उत्पादनाचे असेल, तर सर्वात वर फ्री लिहिलेले असते. फ्री, म्हणजे फुकट मिळणार्‍या गोष्टीचे भारतीय लोकांना एवढे आकर्षण आहे की, तुम्ही काहीही फ्री म्हणून लिहा लोक ते पूर्ण वाचतीलच. एकावर एक फ्री, तीन शर्टवर चार शर्ट फ्री, पाच पँटींवर 12 पँटी फ्री, म्हणजे फ्री वादाची चंगळ सर्व जाहिरातींमध्ये असतेच असते पण होर्डिंगवर पण असते. म्हणजे आता असे अवाढव्य होर्डिंग मुख्य रस्त्यांवर जागोजागी असताना आपण सामान्य नागरिकांची जबाबदारी अधिक वाढली आहे. आपण पायी चालताना किंवा वाहन चालवताना त्या गर्दीमध्ये इतर वाहनांबरोबर धडकून आपला अपघात होऊ नये, याची तर काळजी घ्यावी लागेलच; पण त्याचबरोबर पावसाळ्याच्या दिवसात एखादे झाड, एखादा खांब किंवा एखादे होर्डिंग आपल्या अंगावर कोसळणार नाही, याची काळजी घेऊन गाडी चालवावी लागेल हे नक्की. आधीच जगण्यासाठी काय कमी आटापिटा आहे का, त्यात पुन्हा ही भर. म्हणजे सामान्य माणसाने जगायचे कसे हा मोठाच प्रश्न निर्माण झाला आहे. होर्डिंग लावावी जरूर मात्र ते करत असताना सर्वसामान्यांना त्याचा फटका बसणार नाही, याची काळजी घ्यावीच लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT