मुंबई : पुढारी वृत्तसेवा : दुबईहून आलेले तीन अतिरेकी मुंबईमध्ये घुसले असून त्यांचा संबंध पाकिस्तानशी असल्याची खोटी माहिती देणारा कॉल केला कुणी, याचा शोध सुरु असल्याचे गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत कदम यांनी सांगितले.
मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षातील दक्ष नागरीक बूथवर शुक्रवारी दुपारी १२ वाजून ०५ मिनिटांनी एका अनोळखी नंबरवरुन हा कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने आपले नाव राजा ठोंगे असल्याचे सांगितले. एका अतिरेक्याचे नाव मुजीब सय्यद असल्याची माहितीही त्याने दिली. सोबतच त्याने दोन मोबाईल क्रमांक, एक नऊ अंकी क्रमांक आणि एम. एच. १६ बीझेड ८०३२ असा गाडीचा नंबर पोलिसांना दिला. या व्यक्तींचा दोन नंबरचा धंदा असल्याचाही दावा कॉलरने केला होता. पुण्यावरुन बोलत असल्याचे सांगून त्याने कॉल कट केला.
या एका फोनमुळे मुंबई शनिवारी दिवसभर हैराण झाली. पोलिसांनी महत्वाच्या आणि अतिसंवेदनशील, तसेच गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्तात वाढ करत संशयित व्यक्ती, वस्तू, वाहानांची तपासणी सुरु केली. सोबतच पोलिसांनी कॉल करणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईल नंबरच्या आधारे त्याचा शोध सुरु केला.
कॉल करण्यासाठी वापरण्यात आलेला नंबर हा बीड जिल्ह्यातील आष्टी येथील एका व्यक्तीच्या नावावर असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्या व्यक्तीकडे चौकशी केली असता त्याने आपण असा नंबर विकत घेतला नसल्याचे सांगितले.