पुढारी ऑनलाईन डेस्क : देशभरात सध्या एका लव्ह स्टोरीची चर्चा आहे. ही लव्ह स्टोरी आहे नेपाळमार्गे भारतात आलेली पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि उत्तर प्रदेशमधील तरुण सचिन मीणा या दोघांची. सचिनसाठी सीमा ही आपल्या चार मुलांसह नेपाळमार्ग भारतात आली. मात्र हा संपूर्ण प्रकारच संशयास्पद असल्याने उत्तर प्रदेश पोलिसांनी याची सखोल चौकशी सुरु केली. (Seema Haider News ) जाणून घेवूया सीमा हैदर ही संशयाच्या जाळ्यात कशी सापडली? पोलिसांना तिच्या कोणत्या हालचाली संशयास्पद वाटल्या याविषयी….
सीमा हैदरच्या तपासात उत्तर प्रदेश पोलिसांसह गुप्तचर विभागासह दहशतवादविरोधी पथकही (एटीएस) उडी घेतली आहे. सोमवार १७ जुलै रोजी एटीएसने सीमा हैदर आणि तिचा कथित पती सचिन यांना ग्रेटर नोएडातील रबुपुरा गावातून ताब्यात घेतले. दोघांची सहा तास स्वतंत्रपणे चौकशी केली. सीमाचे फोन कॉल डिटेल्स, पाकिस्तानातून दुबई, नंतर काठमांडू आणि तेथून ग्रेटर नोएडापर्यंत पोहोचण्याची गोष्ट तपासली जात आहे.
पोलीस तपासामध्ये सीमाकडे दोन वेगवेगळे पासपोर्ट असल्याचे आढळले. तसेच तिच्याकडे चार स्मार्ट फोन असल्याचेही निदर्शनास आले. तसेच तिचा भाऊ पाकिस्तानी लष्करात असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. दरम्यान दैनिक 'भास्कर'ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे की, सीमाला उत्तर प्रदेश पोलिसांनी १४ दिवसांपूर्वी प्रथम अटक केली होती. मात्र आतापर्यंत पोलिस तिचे मोबाईल फोन फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवू शकलेले नाहीत.
या प्रकरणी तपास करणारे रबुपुरा पोलिस स्टेशनचे प्रभारी सुधीर कुमार आणि जेवर पोलिस स्टेशनचे प्रभारी मनोज कुमार सिंह यांनी दैनिक 'भास्कर'ला सांगितले की, यापूर्वी हे प्रकरण रबुपुरा पोलिस ठाण्यात होते. सीमाच्या सुटकेपूर्वी म्हणजेच ७ जुलैरोजी उच्चस्तरीय तपासासाठी हे प्रकरण ग्रेटर नोएडातील जेवर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले होते.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यूपी-एटीएस पाकिस्तानातून भारतात येताना सीमा कोणाला भेटली आणि तिला कोणी मदत केली हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. सीमा हैदर तिच्या सिममधून कोणाशी बोलली? त्याच्याकडे किती मोबाईल फोन आणि मोबाईल नंबर आहेत.सध्या उत्तर प्रदेश पोलीस, एटीएस आणि गुप्तचरविभागाला सीमाने रचलेल्या कथेवर शंका व्यक्त करत आहेत.
सीमा हैदरला पोलिसांनी सर्वप्रथम ४ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. ती आपली ओळख न सांगता सुमारे दीड महिने सचिनची पत्नी म्हणून राबुपुरा गावात राहत होती. कोर्ट मॅरेजसाठी त्याने वकिलाशी संपर्क साधला असता प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. सीमा, सचिन आणि सचिनचे वडील नेत्रपाल यांना ४ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. रबुपुरा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी सीमेवरून अनेक कागदपत्रे आणि मोबाईल जप्त केले आहेत.