पांडुरंग सांडभोर
पुणे : हू इज धंगेकर…? कसबा विधानसभेची तब्बल सत्तावीस वर्षे भाजपच्या ताब्यात असलेली जागा खेचून आणत रवींद्र धंगेकर यांनी ते नक्की कोण आहेत हे अवघ्या महाराष्ट्राला दाखवून दिले. कार्यकर्त्यांच्या गळ्यातील ताईत ठरलेल्या आणि सर्वसामान्यांच्या मनात असलेल्या रवींद्र धंगेकरांचा जीवनपरिचय नक्की काय, त्यांचे लहानपण कसे होते, त्यांचे कुटुंब काय करते, ते कुठल्या शाळेत शिकले, समाजकारणातून राजकीय क्षेत्रात कसे आले, कार्यकर्ता ते नगरसेवक आणि पुढे आमदार कसे झाले, या प्रश्नांचा उलगडा करणारा हा वृत्तवेध…
धंगेकर कुटुंबीय मूळचे दौंड तालुक्यातील नाथाची वाडीचे. त्यांचे मूळ आडनाव झाडगे असे आहे. रवींद्र धंगेकर यांचा जन्म बारामती तालुक्यातील निरा करंजेपूल येथील आजोळघरी झाला. पुण्यातील रविवार पेठेतच झाला. त्यांचे वडील हेमराज धंगेकर यांची चुन्याची भट्टी आणि कोळशाचे दुकान होते, तर आई गृहिणी होती. रविवार पेठेतील सुभाष प्राथमिक शाळेत धंगेकर यांचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर रास्ता पेठेतील राजा धनराज गिरजी हायस्कूलमध्ये त्यांचे आठवीपर्यंतचे शिक्षण झाले.
तर नाथाची वाडी येथील माटोबा विद्यालयातही त्यांनी काही काळ माध्यमिक शिक्षण घेतले. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने त्यांनी आठवीतच शाळा सोडली आणि रविवार पेठेतील दागिने घडविणा-या सोनार कारागिरांकडे सोने घडणावळीचे काम शिकण्यास सुरुवात केली. हे काम शिकून त्यांनी घराला हातभार लावण्याचे काम केले. शालेय जीवनात त्यांना कुस्तीचे वेड होते, त्यासाठी काही काळ ते गावी गेले होते. कुस्तीच्या अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घेऊन बक्षिसे मिळवली.
दरम्यान, 1989 मध्ये त्यांनी हिंदमाता प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरुवात केली. याच काळात ते शिवसेनेच्या संपर्कात आले आणि रविवार पेठ शिवसेना शाखाप्रमुखपदापासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. तत्कालीन शिवसेनेचे नेते दीपक पायगुडे आणि रमेश बोडके यांच्या तालमीत ते घडत गेले. 1997 च्या महापालिका निवडणुकीत त्यांनी बहीण वंदना हिला सेनेची उमेदवारी मिळवून दिली. या निवडणुकीत त्या विजयी झाल्या. पुढे 2002 च्या महापालिका निवडणुकीत धंगेकर स्वत: निवडणूक रिंगणात उतरले.
पहिल्याच निवडणुकीत ते विजयी झाले. याच काळात शिवसेनेतून राज ठाकरे बाहेर पडले. त्यांच्या समवेत महाराष्ट्रातून बरोबर जाणारे धंगेकर हे पहिले नगरसेवक होते. 2007 ची निवडणूक त्यांनी मनसेकडून लढविली. मनसेचे 7 नगरसेवक या निवडणुकीत विजयी झाले. महापालिकेतील मनसेचे गटनेतेपद त्यांना मिळाले. त्यानंतर 2009 च्या विधानसभा निवडणुकीत रवींद्र यांनी थेट गिरीश बापट यांच्या विरोधात शड्डू ठोकला. मात्र, तिरंगी लढतीत मतविभागणीमुळे त्यांना 7 हजार मतांनी पराभवाला सामारे जावे लागले.
2012 ची महापालिका निवडणूक त्यांनी लढविली. या निवडणुकीत मनसेचे तब्बल 27 नगरसेवक निवडून आले. थेट पालिकेतील विरोधी पक्षनेतेपद मनसेकडे आले. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाची माळ धंगेकर यांच्या गळ्यात पडेल असे वाटत असतानाच पक्षाने त्यांना डावलले गेले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा मनसेकडून निवडणूक लढविली. मोदी लाटेत त्यांना पुन्हा मोठ्या मतांनी पराभव स्वीकारावा लागला. मात्र, निवडणूक आणि धंगेकर हे समीकरण पुढेही सुरूच राहिले.
2017 च्या पालिका निवडणुकीच्या वेळेस मनसेला मोठी गळती लागली. अनेक मनसे नगरसेवकांनी मोदी लाट लक्षात घेऊन भाजपची वाट धरली. रवींद्र धगेकर यांनी विधानसभेची गणिते डोळ्यांसमोर ठेवून काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, काँग्रेसच्या भोंगळ कारभाराचा फटका त्यांना बसला. एबी फॉर्मच्या गोंधळामुळे त्यांना काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली. त्यावेळेस पालिका निवडणुकीत भाजपची लाट असताना धंगेकर यांनी त्यावेळेस भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांचा सनसनाटी पराभव करून रवींद्र धंगेकर नावाची जादू दाखवून दिली.
काँग्रेसला त्यांची किंमत तेव्हाही कळली नाही, कारण 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली नाही. तरीही ते पक्षाबरोबर कायम राहिले. त्यातच 2023 ची पोटनिवडणूक लागली आणि आता भाजपला हरवायचे असेल, तर धंगेकरांना उमेदवारी दिली पाहिजे अशी जनभावना निर्माण झाली. काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली आणि धंगेकर यांनी भाजपच्या मोठ्या आव्हानाचा सामना करीत ही निवडणूक तब्बल 11 हजारांहून अधिक मतांनी जिंकत कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर या नावावर शिक्कामोर्तब केले. विजयानंतर त्यांनी भाजपच्या 'हू इज धंगेकर' या टीकेला 'मी रवींद्र धंगेकर' हे अगदी समर्पक प्रत्युत्तर दिले आहे.