बांगलादेशच्या अव्वल अष्टपैलू खेळाडू शाकिब – अल – हसनने बऱ्याच दिवसांनी चांगली कामगिरी केली. त्याने टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचे लसिथ मलिंगाचे रेकॉर्ड तोडले. हससने वर्ल्ड टी २० वर्ल्डकपच्या पात्रता फेरीत स्कॉटलँड विरुद्ध प्रभावी मारा केला. त्याने ४ षटकात १७ धावा देत २ विकेट मिळवल्या. दरम्यान टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत भारतीय गोलंदाज कुठे आहेत अशी एक चर्चा सुरु झाली आहे. भारताकडून टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट या यजुवेंद्र चहल याने घेतल्या आहे.
शिकब – अल – हसनने स्कॉटलँड विरुद्धच्या सामन्यात बेरिंग्टनची विकेट घेत लसिथ मलिंगाच्या सर्वाधिक १०७ विकेट्सची बरोबरी केली. त्यानंतर शाकिबने लेस्कची विकेट घेत मलिंगाला मागे टाकत टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचे वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केले.
विशेष म्हणजे शकिब – अल – हसनने टी २० क्रिकेटमध्ये एक हजारपेक्षा जास्त धावाही केल्या आहे. शाकिब हा टी २० क्रिकेटमध्ये १००० पेक्षा जास्त धावा आणि १०० पेक्षा जास्त विकेट घेणारा एकमेव अष्टपैलू खेळाडू आहे.
टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत शकिबनंतर कोणा कोणाचा नंबर लोगतो? या यादीत त्याच्या सर्वात जवळ आहे तो टीम साऊदी. त्याने ८१ टी २० सामन्यात ९९ विकेट घेतल्या आहेत. त्या पाठोपाठ ५१ सामन्यात ९५ विकेट घेणारा अफगाणिस्तानचा राशिद खान दुसऱ्या स्थानावर आहे. हे दोघेही गोलंदाज टी २० क्रिकेटमधील आपले विकेट्सचे शतक पूर्ण करण्याचे उंबरठ्यावर पोहचले आहेत.
टी २० क्रिकेटमध्ये भारतीय गोलंदाज चांगलेच मागे पडले आहेत. टी २० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत यजुवेंद्र चहल सर्वात आघाडीवर आहे. मात्र त्याला युएई आणि ओमानमध्ये होत असलेल्या टी २० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघात जागा मिळवण्यात यश आले नाही.
यजुवेंद्र चहल टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत तब्बल २० व्या स्थानावर आहे. त्याने ४९ सामन्यात ६३ विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे सध्या तरी शाकिबशी कोणताही भारतीय गोलंदाज स्पर्धाच करु शकत नाही.