प्रातिनिधक छायाचित्र 
Latest

बहार विशेष : कुठे दुष्काळ, कुठे अतिवृष्टी!

Arun Patil

हवामान बदलांमुळेच गेल्या तीन दशकांत गंगा नदीच्या पात्रात अणि ईशान्य भारतात पावसाचे प्रमाण कमी राहत आहे. त्याचवेळी उत्तर पश्चिम भारत, पश्चिम घाट, तामिळनाडू, रायलसीमा, तेलंगणा आदी ठिकाणी प्रमाणाबाहेर पाऊस पडत आहे. अन्य भागात पाऊस किंवा दुष्काळाचा एकाचवेळी सामना करावा लागत आहे. आगामी काळात जागतिक तापमान वाढल्याने पावसाचे प्रमाण वाढेल. त्यामुळे आपल्याला पाणीसाठा आणि व्यवस्थापनाच्या पर्यायांवर पुनर्विचार करायला हवा.

भारतात बदलणारे हवामान आता चिंतेचा विषय ठरत आहे. ग्रीन हाऊस गॅसेसचे उत्सर्जन आणि त्यापासून वाढणारे जागतिक तापमान शहरावरच नाही, तर मानवी आरोग्यावरदेखील परिणाम करत आहे. 1850 च्या औद्योगिक क्रांतीच्या पूर्वीपासून पृथ्वीचे तापमान 1.2 अंश सेल्सिअसने वाढले आहे. हा एक सरासरी आकडा आहे. जगातील वेगवेगळ्या भागात प्रामुख्याने उत्तराखंड, हिमाचल प्रदेशसारख्या पर्वतीय राज्यांत ही वाढ अधिक राहू शकते. प्रत्येक एक अंश सेल्सिअस तापमान वाढल्याने वातावरणात आर्द्रतेचा स्तर हा सात ते आठ टक्के वाढत जातो. परिणामी, सर्वसाधारण पावसापेक्षा प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो, तर कधी कधी ढगफुटीसारख्या घटनेला सामोरे जावे लागते. दाट आणि उंच ढगात गारा अधिक मोठ्या असतात. त्यामुळे वीज जोरात कडाडते आणि त्याचबरोबर वीज कोसळण्याच्या घटनाही वाढतात. भारतात 2000 ते 2021 या काळात 49 हजारांपेक्षा अधिक नागरिकांचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला आहे. यावर्षीदेखील वीज पडल्याने मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या अधिक आहे. मुसळधार पावसाने यावर्षी भारतात 2000 पेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत. एकट्या बिहारमध्ये 500 पेक्षा अधिक लोकांचा बळी गेला आहे.

हवामान बदलाचा आणखी एक दुष्परिणाम म्हणजे अधूनमधून पाऊस पडणे आणि उष्णता वाढणे. त्यात पाऊस पडतो आणि तोही खूप जोराचा असतो. त्याचवेळी त्याचा कालावधीदेखील कमी असतो. आता पाच ते सात दिवसांतच संपूर्ण हंगामातील पावसाची नोंद होते. गेल्या जुलै महिन्यात राजस्थान आणि गुजरातमध्ये तर हीच स्थिती झाली. जुनागडमध्ये तर 'न भूतो न भविष्यती' असा पाऊस झाला. गाड्या पाण्यावर तरंगत होत्या. हे द़ृश्य आपण टीव्हीवर पाहिले. याप्रमाणे हवामान बदलामुळे उष्णतेच्या झळा अधिकच वाढल्याचे दिसून येत आहे. आता पुढेही अशीच परिस्थिती राहील. यात विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, चक्रीवादळ आदींसह पडणारा पाऊस पूर्वीपेक्षा अधिक होताना दिसतो. त्यामुळे वातावरणात निर्माण होणारे चक्रीवादळ आता अधिक विनाशकारी, प्रलयंकारी सिद्ध होत आहे. या कारणांमुळे पर्वतीय भागाच्या राज्यांतील वरच्या भागात पावसाचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. त्यामुळे पूर आणि सखल भागात महापूर येण्याची स्थिती निर्माण होते. काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशसारख्या राज्याला असेच नुकसान सहन करावे लागले. अजूनही हिमाचल या संकटातून सावरलेले नाही.

हवामान बदलामुळेच गेल्या तीन दशकांत गंगा नदीच्या पात्रात आणि ईशान्य भारतात पावसाचे प्रमाण कमी राहत आहे. त्याचवेळी उत्तर पश्चिम भारत, पश्चिम घाट, तामिळनाडू, रायलसीमा, तेलंगणा आदी ठिकाणी प्रमाणाबाहेर पाऊस पडत आहे. अन्य भागात पाऊस किंवा दुष्काळाचा एकाचवेळी सामना करावा लागत आहे. दुष्काळाची स्थिती खरीप पिकाच्या वेळी राहत असेल, तर त्याचा परिणाम कृषी उत्पादनावर पडू शकतो. जसे ऑगस्ट महिन्यात पाहावयास मिळाले. प्रामुख्याने डाळी, तेलबिया आणि पावसावर अवलंबून असलेल्या अन्य पिकांवरून शेतकर्‍यांची चिंता वाढणे स्वाभाविक आहे. हवामान बदलामुळे पावसाचे दिवस कमी होत आहेत. मात्र, मुसळधार पावसाच्या घटनाही घडत आहेत. आगामी काळात जागतिक तापमान 1.5 अंश सेल्सिअसवरून दोन अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्याने पावसाचे प्रमाण वाढेल. त्यामुळे आपल्याला पाणीसाठा आणि व्यवस्थापनाच्या पर्यायांवर पुनर्विचार करायला हवा. जेणेकरून मुसळधार पाऊस आला तर शेतीसाठी अतिरिक्त पाण्याची साठणूक आणि पुरवठा सुलभ होईल.

हवामानाची दिशा बदलत असून, कधी विक्रमी पाऊस पडत आहे; तर कधी उष्णतेची लाट येत आहे. वेस्टर्न डिस्टबर्न्स आणि मान्सून यांच्यात परस्पर क्रिया होते, तेव्हा त्याचा प्रभाव असलेल्या भागात मुसळधार पाऊस पडतो. मुसळधार पावसाची ही स्थिती तीन ते पाच दिवस राहते. जसे जुलै महिन्यात हिमाचल प्रदेशात पाहावयास मिळाली. अशा पावसाची तीव्रता मागील सर्व विक्रम मोडू शकते. याप्रमाणे उष्णतेची तीव्रतादेखील दरवर्षी वाढत चालली आहे. नैसर्गिक आपत्तीच्या घटनांत सातत्याने वाढ होत असून, त्यात हवामान बदल घटक जबाबदार आहे. जागतिक तापमान वाढले असून, त्याच्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच काही भागात मुसळधार, तर एका मोठ्या भूभागावर दुष्काळाची छायादेखील पाहावयास मिळत आहे. अर्थात, पावसाळा अनेक घटकांवर अवलंबून असतो.

जसे अल निनो, हिंद महासागरातील 'डाय-पोल (द्विध्रुव) स्थिती' या कारणांमुळे एकाचवेळी देशातील विविध भागात पाऊस आणि दुष्काळ याचा सारखाच अनुभव येतो. म्हणूनच ऑगस्ट महिना अनेक भागात कोरडा गेला. अशा हवामानाचा मानवी आरोग्यावरदेखील प्रतिकूल परिणाम होत आहे. कधी कधी उष्णतेच्या लाटेने मृत्यू पडणार्‍यांची संख्या वाढत आहे. उष्णतेच्या लाटांचे व्यवस्थापन केल्यास काही प्रमाणात अशा घटना रोखता येऊ शकतील. दुसरीकडे, पावसानंतर उष्णता आणि आर्द्रता या वातावरणामुळे डेंग्यू, चिकुनगुनिया यांसारख्या आजारांना कारणीभूत असणारे डास वाढण्याला हातभार लागतो. हवामानात पाणी खराब होते तर मलेरिया, अतिसारासारख्या आजारांचा फैलाव होण्याचा धोका राहतो. वाढत्या प्रदूषणामुळे अस्थमा आणि फुप्फुसात संसर्ग वाढण्याचा धोकादेखील राहतो. अशा वेळी तापमानाचा पराकोटीचा अनुभव घेण्यापासून वाचण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.

जीवनशैलीशी संबंधित असणारी पायाभूत रचना भविष्यातील परिस्थितीशी अनुकूल तयार करावी लागेल. नैसर्गिक पातळीवरची जोखीम ओळखून पायाभूत आराखडा आणि प्रणालींचा आढावा घ्यावा लागेल. जोशीमठ आणि परिसरात पाहावयास मिळालेल्या भूस्खलनासारख्या स्थितीपासून वाचण्यासाठी भरीव प्रयत्न करता येईल. देशभरात राबविण्यात येणार्‍या विकास योजनांमुळे निर्माण होणारी संभाव्य जोखीमदेखील पाहिली पाहिजे आणि त्यानुसार त्याची आखणी करायला हवी. यानुसार पूर आणि आर्थिक हानीपासून वाचू शकतो. पावसाचे जादा प्रमाण लक्षात घेता, आपल्याला आता प्रत्येक शेतकरी कुटुंबाला शेततळे तयार करण्यासाठी प्रोत्साहित करावे लागेल. जेणेकरून वातावरणात दीर्घकाळ राहणारी उष्णता आणि कमी पावसाच्या स्थितीत त्याच्याकडे सिंचनाची पर्यायी व्यवस्था राहील.

अशा स्थितीत सर्वसामान्य नागरिकांची जबाबदारी अधिकच वाढते. सांडपाणी व्यवस्थेकडे दुर्लक्ष करणे, अतिक्रमण यांसारख्या मानसिकतेतून आपल्याला बाहेर पडावे लागेल. जेणेकरून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह रोखला जाणार नाही. हवामान शास्त्रज्ञांचे काम अनेक पटींनी वाढले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT