Latest

अजबच..! पहिला किस कोठे आणि कोणी घेतला? नवीन संशोधनात आली ही माहिती समोर

Arun Patil

नवी दिल्ली : एखादा नामवंत खेळाडू किंवा प्रसिद्ध अभिनेता जेव्हा आपल्या चाहत्यांना फ्लाईंग किस देतो तेव्हा चाहत्यांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटते. तथापि, पहिला किस कुठे आणि कोणी घेतला असेल असा प्रश्न आपल्या मनाला कधी तरी चाटून जातो.

ओठांवरील चुंबन हे प्रेमाचे प्रतीक बनले. चुंबनातही फ्रेंच किस प्रसिद्ध आहे. त्यामुळे किसिंगची सुरुवात त्यांच्यापासूनच झाली की काय? असे वाटणे साहजिक आहे. मात्र, तसे नाही. काही संशोधकांचे म्हणणे आहे की, चुंबन भारतातून सुरू झाले आणि विदेशी आक्रमणानंतर ते जगभर पसरले. कधी एखाद्या स्टेजवर अभिनेत्रीचे चुंबन घेण्यात आल्याने तर कधी ऑन स्क्रीन केलेल्या किसिंग सीनमुळे या गोष्टी चर्चेत राहतात.

ब्रिटनचे विद्यमान सम्राट राजे चार्ल्स यांनी भारताला जेव्हा ते युवराज असताना भेट दिली होती तेव्हा पद्मिनी कोल्हापुरे या अभिनेत्रीने त्यांचे चुंबन घेतले होते आणि तेव्हा त्याचा मोठा बोलबाला झाला होता. असो. किसची सुरुवात केव्हापासून झाली याबद्दल मानववंशशास्त्रज्ञ वेगवेगळे सिद्धांत देतात. कदाचित जगातील पहिले चुंबन अपघातानेच झाले असावे, असा अंदाज वर्तविला जातो. सत्य असे आहे की, किसिंगची सुरुवात ही प्रेमाच्या नव्हे तर मायेच्या भावनेने झाली आहे. त्याच झाले असं की, आपल्या पूर्वजांनी म्हणजे माकडांनी याची सुरुवात केली.

जेव्हा एक आई लहान माकडाला खायला घालायची तेव्हा बाळाला खाऊ भरवण्याची पद्धतही वेगळी होती. त्यावेळी आई आधी स्वत: अन्न तोंडात घ्यायची आणि चावून अगदी बारीक करून ते अन्न तोंडानेच बाळाच्या तोंडात द्यायची. याला 'प्रीमॅस्टिकेशन फूड ट्रान्सफर' असेही म्हणतात. आजही अनेक प्राणी आपल्या लहानग्यांना अशाच पद्धतीने खायला भरवतात. त्यातूनच किस करण्याची सुरुवात अश्मयुगीन काळात झाली असावी, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. केवळ खाद्य भरवतानाच नव्हे तर इतरवेळीही चिंपांझी माता आपल्या मुलांचे चुंबन घेतात. त्यामुळे चुंबन घेण्याचा व्यवहार आपण आपल्या पूर्वजांकडून शिकलो असण्याची शक्यता आहे.

टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटीच्या मानव वंशशास्त्र विभागाने यावर मोठा अभ्यास केला आणि असा दावा केला की, पूर्वीच्या काळात भेटल्यानंतर लोक परस्परांच्या शरीराचा वास घेत असत. याला कोणतेही शास्त्रीय कारण नाही. मात्र, असे करत असतानाच अपघाताने ओठांना ओठांचा स्पर्श झाला असेल आणि मनुष्यजातीत चुंबनन घेण्याची प्रथा सुरू झाली असावी, असा दावा मानववंश शास्त्रज्ञांनी केला आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT