ही घटना आहे 1977 मधील. उत्तर प्रदेशातील इटावा पोलिस स्थानकात संध्याकाळी सहाच्या सुमारास मळलेला कुर्ता परिधान करून एक शेतकरी दाखल झाला. आपली बैलजोडी चोरीला गेल्याची तक्रार त्याला नोंदवायची होती.
बराच काळ झाला तरी त्याच्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. अखेर तो तेथून बाहेर पडणार, एवढ्यात एक पोलिस हवालदार त्याच्याकडे आला व त्याने तक्रार नोंदवून घेण्याचे मान्य केले. मात्र, चहापाण्यासाठी त्याने त्या शेतकर्याकडे 35 रुपये मागितले. ते त्याला देण्यात आले. तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर पोलिसाने रजिस्टर पुढे करून त्यावर शेतकर्याला सही करायला सांगितली. ती सही होती चौधरी चरण सिंह. यानंतर त्यांनी खिशातून शिक्का काढला. तो शिक्का होता प्रधानमंत्री भारत सरकार या नावाचा.
त्यानंतर सारे पोलिस ठाणे नखशिखांत हादरले. उपस्थित असलेल्या सर्वांनाच काही क्षणांत निलंबित करण्यात आले. वेशांतर केलेले चरण सिंह कोणाच्या लक्षातही आले नाहीत. अनेक दिवसांपासून त्यांच्याकडे पोलिसांच्या खाबुगिरीच्या तक्रारी येत होत्या. त्यावर त्यांनी असा अनोखा उपाय केला.