Latest

नगर: रब्बी हंगामात ज्वारी, गव्हाच्या क्षेत्रात वाढ!

अमृता चौगुले

शशिकांत पवार

नगर तालुका : नगर तालुक्यात ज्वारी व गव्हाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली असून, कांद्याच्या क्षेत्रात घट झाल्याचे चित्र पाहावयास मिळते. अतिवृष्टीमुळे कांद्याची रोपे वाया गेल्याने कांद्याचे क्षेत्र घटले असून, गहू व ज्वारीच्या क्षेत्रात वाढ झाली. तालुक्यात रब्बी हंगामासाठी 59 हजार 323 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आलेले आहे. आजपर्यंत सुमारे 68 टक्के क्षेत्र लागवडीखाली आले असून, त्यामध्ये ज्वारीच्या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. नगर तालुका ज्वारीचे पठार म्हणून ओळखला जायचा; परंतु गेल्या दशकापासून तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड होत असून, तालुका कांद्याचे पठार म्हणून उदयास येत आहे.

चालू वर्षी अतिवृष्टीने कांद्याच्या रोपांची वाताहात झाली. त्यामुळे कांद्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली. पावसाच्या सुरुवातीपासून पावसाने जोरदार एन्ट्री करत अखेरपर्यंत संततधार पाऊस सुरूच होता. त्यामुळे शेतकर्‍यांच्या खरीप हंगामातील सर्वच पिकांना मोठा फटका बसला. कांद्याचे रोपे वाया गेल्याने शेतकर्‍यांनी गहू, हरभरा, ज्वारी पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात केली. रब्बी हंगामातील एकूण क्षेत्रापैकी 68 टक्के क्षेत्र लागवडीखाली आले. काही भागात कांद्याची लागवड, तसेच गव्हाची पेरणी सुरू आहे. अतिवृष्टीमुळे शेतात पाणी उपळल्यामुळे मशागतीसाठी विलंब झाल्याचे चित्र आहे.

तालुक्यात ज्वारीची पेर 23 हजार 117 हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली. तर, गहू दोन हजार 759 हेक्टर, कांद्याची लागवड 13 हजार हेक्टर, तर हरभरा नऊ हजार 617 हेक्टर क्षेत्रावर पेरण्यात आला. चारा पिकाच्या प्रमाणातही वाढ झाल्याचे दिसून येते. नगर तालुक्यात जेऊर पट्ट्याला कांद्याचे पठार म्हणून ओळखले जाते. जेऊर मंडळात सर्वाधिक चार हजार 231 हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड करण्यात आली आहे.

सद्यस्थितीत कांदा, गहू, हरभरा पिके जोमात असले, तरी काही प्रमाणात पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. कांदा पिकावर मावा, तुडतुडे, थ्रिप्स तसेच काही प्रमाणात जांभळा करपा, डाऊनी रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. थंडीचे प्रमाण कमी असल्याने गहू व हरभरा पिकांच्या उगवणीवर देखील परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. गव्हाच्या पिकावर थोड्या प्रमाणात मावा, तुडतुडे, तांबेरा रोगांचा प्रादुर्भाव आढळतो, तर हरभरा पिकावर मर रोग आढळून येत आहे. शेतकर्‍यांनी कीटकनाशके व बुरशीनाशक औषधांची खरेदी करताना बनावट औषधांबबाबत दक्षता घ्यावी. अनुभवी, कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. औषध फवारणी शक्यतो सकाळी किंवा दुपारनंतर करावी.
-संदीप काळे, कृषी तज्ज्ञ साईनाथ कृषी उद्योग, जेऊर

ढगाळ वातावरणामुळे कांदा व गव्हाच्या पिकांवर मावा, तुडतुडे रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. अशावेळी कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषध फवारणी करावी. पाण्याचे व्यवस्थापन नियोजनबद्ध करावे. शक्यतो ठिबक सिंचनाचा वापर करावा. अतिरिक्त पाण्याचा वापर करू नये.
– पोपटराव नवले, तालुका कृषी अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT