पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रशिया-युक्रेन युद्धाच्या ऐन धामधुमीत रशियाचा दौरा करून अध्यक्ष पुतीन यांची भेट घेतली. या नव्या समीकरणामुळे भारत आणि रशिया यांच्या परंपरागत व ऐतिहासिक संबंधाला बाधा येऊ शकते, अशी निरीक्षणे नोंदवली जात आहेत. त्यात कितपत तथ्य आहे?
गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तान हा जगात एकाकी पडलेला देश आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची फारशी दखल घेतली जात नाही. अगदी अलीकडेपर्यंत अमेरिकेच्या भूराजनीतिक धोरणात पाकिस्तानला महत्त्वाचे स्थान होते. भारतासारख्या मोठ्या लोकशाही देशाकडे त्यामुळे अमेरिकेने दुर्लक्ष केले होते; पण बदलत्या परिप्रेक्ष्यात अमेरिकेला भारत इतका महत्त्वाचा वाटू लागला आहे की, त्याला खूश करण्यासाठी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी इम्रान खान यांच्याशी फोनवर बोलणे टाळले. अमेरिकेने हे असे दुर्लक्ष केल्यामुळे आता चीन वगळता पाकिस्तानला जगात कोणीही वाली राहिलेला नाही.
त्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे सतत रशियाशी संबंध स्थापण्याचा प्रयत्न करीत आहेत. रशिया आणि भारत यांचे अत्यंत सखोल व ऐतिहासिक संबंध असले, तरी अलीकडच्या काळात भारताचे अमेरिकेशी चांगले संबंध निर्माण झाले आहेत. रशियाशी चांगले संबंध ठेवूनही अमेरिकेशी स्थिर संबंध प्रस्थापित करणे भारताला शक्य झाले. भारताने पूर्ण राजनीतिक कौशल्य वापरून अमेरिका व रशियाबरोबरच्या संबंधात समतोल साधला. असे असले, तरी रशियन धोरणकर्त्यांच्या मनात थोडी चलबिचल सुरू झाली आहे. अशा वेळी भारताला अमेरिकेच्या बाजूने फार झुकू देणे रशियाला परवडणारे नाही. त्यामुळे भारताला इशारा देण्यासाठी रशिया पाकिस्तानचा उपयोग करीत आहे, असे दिसते.
यापूर्वी रशियाचे परराष्ट्रमंत्री लावरोव भारतातून मायदेशी परताना पाकिस्तानात उतरले होते. त्यांच्या या पाकिस्तान भेटीतून फारसे काही निष्पन्न झाले नाही; पण इम्रान खान यांनी त्यांच्याकडून रशिया भेटीचे आमंत्रण मिळवले. या आमंत्रणाचाच वापर करून इम्रान खान रशिया दौर्यावर गेले; पण या दौर्यासाठी जी वेळ इम्रान यांनी निवडली त्यावर त्यांच्याच देशात मोठी टीका झाली. कारण, युक्रेनवर रशियाने आक्रमण केले होते व जागतिक जनमत रशियाविरुद्ध गेले होते.
रशियाचा हा लढा केवळ युक्रेनविरुद्ध नाही, तर तो अमेरिकेविरुद्धही आहे. त्यामुळे हा दौरा करून इम्रान खान यांनी अमेरिका-रशिया वादात रशियाच्या बाजूने उडी घेतल्यासारखे झाले. बरे, या दौर्यातून इम्रान यांनी काय साध्य केले? मुळात युद्धाच्या धामधुमीमुळे पुतीन यांनी कसाबसा वेळ काढून इम्रान यांची भेट घेतली. चर्चेत इम्रान यांनी रशिया-पाकिस्तान गॅस पाईपलाईन टाकण्याची विनंती त्यांना केली; पण पुतीन यांनी या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या.
सध्याच्या जगातिक सत्तासमतोलात चीन अमेरिकाविरोधी आघाडी बांधत आहे व त्यात रशिया हा महत्त्वाचा घटक आहे. पाकिस्तान हा चीनचा सहकारी देश असल्यामुळे तोही आपोआपच या आघाडीत आहे. या आघाडीचा फायदा घेऊन रशियाशी संरक्षण संबंध स्थापण्याचा इम्रान खान यांचा प्रयत्न होता; पण भारत व रशिया यांचे संरक्षण संबंध इतके घनिष्ट व गुंतागुंतीचे आहेत की, त्यात रशियाच्या पाकिस्तानबरोबरच्या संरक्षण संबंधाला अजिबात स्थान नाही. असे स्थान देणे रशियाला सध्यातरी परवडणारे नाही. याचे एक कारण त्यामुळे भारत नाराज होईलच शिवाय भारतासारखी मोठी बाजारपेठ गमवून दिवाळखोर पाकिस्तानला जवळ करण्यात शहाणपण नाही, हे रशिया जाणून आहे.
पाकिस्तान आशियात अत्यंत मोक्याच्या जागी आहे; पण या स्थानाचा फायदा करून घेणे पाकला जमलेले नाही. रशिया व मध्य आशियाई देश, तसेच इराणसारखे पश्चिम आशियाई देश यांच्याशी भारताचे घनिष्ट व्यापारी संबंध आहेत. भारतातून या देशांकडे जाणारे सर्व मार्ग पाकिस्तानातून जातात. त्यामुळे हे देश व भारत यांच्या गरजेचा फायदा उठवून पाकिस्तान हा आशियातील आर्थिकद़ृष्ट्या एक बलाढ्य देश ठरला असता व त्याला जागतिक राजकारणात मोठे महत्त्व आले असते; पण भारतविरोधी विघातक राजकारणाचा अवलंब करून पाकिस्तानने पायावर धोंडा पाडून घेतला. चीनने भारतविषयक धोरणाच्या उपयुक्ततेतून पाकिस्तानला जवळ केले. त्यापलीकडे चीनसाठी पाकिस्तान ही गळ्यातील धोंड आहे. ही धोंड रशिया आपल्या गळ्यात कशासाठी बांधून घेईल? त्यामुळे इम्रान खान यांच्या रशिया दौर्यातून फारसे काहीही निष्पन्न झालेले नाही.
– दिवाकर देशपांडे