Latest

संकटकाळात गुंतवणूकदारांनी काय करावे? ‘या’ तीन गोष्टी महत्त्वाच्या

Arun Patil

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अखेर सुरू झाल्यामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये प्रचंड मोठी घसरण पाहायला मिळाली. भारतीय शेअर बाजाराचा विचार करता गुरुवारी दि. 24 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 815 अंकांनी गडगडला; तर सेन्सेक्समध्ये 2700 अंकांनी कोलमडला. बँक निफ्टीमध्ये तब्बल 2163 अंकांची घसरण झाली आहे. या अभूतपूर्व घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे जवळपास 13 लाख कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला गेला.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हा युद्धतणाव आणखी किती काळ चालेल, तो निवळेल का की आणखी घनघोर युद्ध पेटेल याविषयीची अनिश्चितता असल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

वास्तविक, 2022 हे वर्ष अशा अस्थिर वातावरणाने भरलेले राहणार आहे, असे बाजारातील जाणकारांकडून सांगितले जात होते. त्यामुळेच अल्पकाळात भरपूर नफा कमावण्याचा उद्देश ठेवून बाजारात गुंतवणूक करण्याचा सध्याचा काळ नाही.

यासंदर्भात तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

1) ज्यांनी दीर्घकालीन म्हणजे तीन ते पाच वर्षांचे उद्दिष्ट ठेवून गुंतवणूक केलेली आहे, त्यांना या वातावरणामुळे भयभीत होण्याचे कारण नाही. कारण अशा प्रकारचे भयकंप आणि त्यामुळे गडगडाटीची त्सुनामी बाजारात यापूर्वीही येऊन गेली आहे. पण त्यातून फिनिक्स भरारी घेत बाजार तितक्याच वेगाने सावरलाही आहे आणि गुंतवणूकदारांना अपेक्षेनुसार परतावाही दिला आहे. शुक्रवारी 25 फेब्रुवारी रोजी याचा प्रत्यय सर्वांना आला असेलच. त्यामुळे अशा काळात गुंतवणूकदारांनी लागलीच घाबरून जाऊन आपली गुंतवणूक काढून घेऊ नये.

2) ज्यांनी अल्पकाळासाठी म्हणजेच तीन महिने-सहा महिने असा कालखंड डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक केली असेल, तर अशा गुंतवणूकदारांनीही लागलीच आपले समभाग विकण्याचा निर्णय घेणे आततायीपणाचे ठरेल. अर्थातच, ही बाब प्रत्येकाच्या जोखीम क्षमतेवर अवलंबून आहे; परंतु बाजाराचा आजवरचा इतिहास असे सांगतो की, अशा प्रकारच्या तणावाबाबत एखादी सुवार्ताही बाजाराला पूर्वस्थानावर घेऊन येते. याचे अलीकडचे उदाहरण म्हणजे 14 फेब्रुवारी रोजी रशिया-युक्रेन संघर्ष आणि एबीजी शिपयार्ड घोटाळ्यानंतर बाजारात अशीच घसरण होऊन गडगडाट झाला होता. पण त्यानंतर दोनच दिवसांनी बाजार सावरलेला दिसला. सबब, एकदा पडझड झाल्यानंतर खूप मोठे नुकसान पदरात पाडून घेऊन बाहेर पडण्यापेक्षा थोडी सबुरी बाळगणे फायद्याचे ठरू शकेल.

3) तिसरा मुद्दा सर्वांत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे अशा संकटांकडे संधी म्हणून पाहण्याचा. गुरुवारी झालेल्या ऐतिहासिक घसरणीनंतर अनेक समभागांच्या भावांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. अशा वेळी दिग्गज कंपन्यांच्या समभागांत गुंतवणूक करण्याची संधी साधल्यास आपले आर्थिक उद्दिष्ट अधिक वेगाने पूर्ण होण्यास चालना मिळू शकते.

यामध्ये प्रश्न उपस्थित केला जातो की, येणार्‍या काळात आणखी घसरण झाली तर काय? यावर एक उपाय म्हणजे आपल्या गुंतवणूक रकमेपैकी किमान 25 ते 30 टक्के रक्कम आताच्या काळात गुंतवणूक करा. समजा, येत्या काळात आणखी घसरण झाल्यास त्यामध्ये आणखी 15 ते 20 टक्के गुंतवा. जेणेकरून तुमचा प्रतिसमभागाचा सरासरी भाव कमी होईल.

तसेच जेव्हा बाजाराचे वरच्या दिशेने मार्गक्रमण सुरू झाल्याचे संकेत मिळतील तेव्हा तातडीने उर्वरित रक्कम गुंतवा. अर्थातच, याचा परतावा मिळण्यासाठी दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवा. तसे करण्याने निश्चित फायदा होईल. यासंदर्भात उदाहरणच पाहायचे झाल्यास, गुरुवारच्या घसरणीच्या दिवशी घसरगुंडी झालेल्या टाटा मोटर्स, आयडीबीआय बँक, टीसीएस, गोकलदास एक्स्पोर्ट, नाल्को, एनएमडीसी, झुआरी ग्लोब, आयडिया, किर्लोस्कर फेरारी, जिंदाल सॉ, जिंदाल स्टील, टेक महिंद्रा आदी अनेक समभाग किमान 3 ते 9 टक्क्यांपर्यंत वधारलेेले दिसले.

आता राहिला मुद्दा ट्रेडर्सचा. बहुतांश जाणकारांच्या मते, सध्याच्या काळात ऑप्शन आणि फ्युचरमध्ये ट्रेडिंग करणार्‍यांनी काही काळ लांब राहणे हिताचे ठरणारे आहे. कारण बाजारात केवळ दोलायमानताच वाढलेली नसून त्याचा वेगही वाढला आहे. अशा वेळी काही मिनिटांत मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागू शकते.

राकेश माने

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT