नागपूर; पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज (दि. २७) लक्ष्य केले. बारामती येथील सभेत अजित पवार यांनी खरं सांगितलं ते सत्तेसाठी नाही तर ईडीमुळे अर्थात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमुळे गेले असावे असा टोला त्यांनी लगावला.
वडेट्टीवार माध्यमांशी बोलताना म्हणाले, मी त्यावेळी मुख्यमंत्री झालो असतो याचाच अर्थ मुख्यमंत्री पदाची सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी ते गेले हे समजू शकतो, त्या पदासाठी नाही तर मग कशासाठी केले हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे पहिल्यांदा सत्य बोलले, हे मी मान्य करतो. शरद पवार, अजितदादा पवार यांच्या सभांमधून उत्तर मिळत आहे. आपापसात ज्या चर्चा आहे, त्यातून उत्तर मिळायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी शंभर टक्के फुटलेली आहे, नऊ आमदार फुटल्यामुळे हे आता स्पष्ट झालं आहे. अजित पवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुणगान करण्याचा दृष्टांत दहा वर्षापूर्वी का झाला नाही? आत्ताच का झाला ते त्यांनाच माहित असा आरोप केला.
मनसेने मुंबई गोवा पदयात्रा काढली आहे, याबाबत बोलतांना तो रस्ता खराब झाला आहे, यापूर्वीच आंदोलन होण्याची गरज होती, समृद्धीपेक्षा तो रस्ता जास्त महत्वाचा आहे, अनेक जण कोकणात जातात, त्या रस्त्यावर आंदोलन होत असतील तर त्यामुळे नक्कीच रस्ता दुरुस्त होईल असा विश्वास वडेट्टीवार यांनी बोलून दाखविला.