पुढारी ऑनलाईन डेस्क : Panauti Word Origin : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या पराभवावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. राजस्थानच्या जालोर येथे जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले की, 'टीम इंडिया क्रिकेट विश्वचषक स्पर्धा जिंकत होती, पण या 'पनौती'मुळे (अपशकून) पराभव पत्करावा लागला.' राहुल गांधींच्या वादग्रस्त विधानांतर देशातील राजकारण चांगलेच तापले. भाजपने तत्काळ राहुल गांधींवर निशाणा साधला आणि पंतप्रधान मोदींसाठी वापरलेल्या अपमानास्पद भाषेवर आक्षेप नोंदवला. तसेच काँग्रेस नेत्याने माफी मागावी, अशी मागणीही केली. अशा या देशातील राजकारण ढवळून काढणा-या 'पनौती' शब्दाची व्युत्पत्ती कशी झाली ते जाणून घेऊया.
'पनौती' या शब्दाची देशभर चर्चा होत असून सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून ट्रेंडवर आहे. हा शब्द कसा निर्माण झाला याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. खरंतर हा शब्द हिंदी भाषेतून बनला आहे. भाषातज्ञ डॉ. सुरेश पंत यांच्या हवाल्याने मीडिया रिपोर्ट्समध्ये दिलेल्या माहितीनुसार, पनौती हा शब्द हिंदीतील औती या प्रत्ययापासून तयार झाला आहे. कटौती, चुनौती, मनौती, बपौती इत्यादी शब्द जसे बनले आहेत, त्याचप्रमाणे पनौती शब्दाची व्युत्पत्ती पन + औती पासून झाली आहे. हिंदीमध्ये पन म्हणजे अवस्था किंवा दशा. त्यातूनच 'बचपन' हा शब्द देखील तयार झाला आहे. अशाप्रकारे औती प्रत्ययाचा वापर करून अनेक शब्दांची निर्मिती झाली आहे.
मनौती म्हणजे मन्नत (प्रार्थना अथवा संकल्प), चुनौती म्हणजे ललकार (आव्हान). बपौती म्हणजे वडिलोपार्जित संपत्ती. कटौती म्हणजे कमी करणे. त्याचप्रमाणे 'पनौती' या शब्दाच्या निर्मितीचे स्वरूप समजून घेतल्यास त्याचा अर्थ अपशकून, त्रास, भयावह आणि विनाशाचे सूचक असा होतो. औती याचा अर्थ पूर असाही होतो, ज्या संबंध वाईट काळाशी लावला जातो. अशाप्रकारे 'पनौती' शब्दाचा अर्थ नकारात्मक असल्याचे स्पष्ट होते. हा शब्द एखाद्या व्यक्तीसाठी किंवा वस्तूसाठी वापरला जाऊ शकतो, जे इतर लोकांसाठी वाईट घटनांचे, समस्यांचे कारण बनतात.
पनौती या नावाचे एक शहर आहे, जे नेपाळच्या बागमती प्रांतातील कावरेपाल्चोक जिल्ह्यात आहे. येथे नगरपालिका आहे. हे शहर राजधानी काठमांडूपासून 32 किमी आग्नेयेस आहे.
कोरा (Quora) वर दिलेल्या माहितीनुसार, पनौती हा शब्द हिंदीसोबतच मराठी भाषेतही वापरला जातो. तेथे हा शब्द वाईट स्थिती संदर्भात वापरतात. उदाहरणार्थ काळ्या मांजरीने आडवे जाणे. मराठीत वाईट बातमी आणणाऱ्यांसाठी पण पनौती संबोधले जाते.
नेदरलँडमधील लीडेन विद्यापीठातील भारतीय भाषांचे व्याख्याते अभिषेक म्हणतात की, 'पनौती हा शब्द गुजराती भाषेतही वापला जातो. ज्याचा वापर दुर्दैवाने प्रभावित झालेला व्यक्ती संदर्भात वापरला जातो. गुजरातीमध्ये पनोती (पर्वण) हा विशिष्ट ग्रहस्थितीचा काळ आहे ज्यामुळे दुःख येते.'