मॉर्निंग डिप्रेशन  
Latest

‘मॉर्निंग डिप्रेशन’ म्हणजे काय?

Arun Patil

नवी दिल्ली : सध्याच्या ताणतणावाच्या, धकाधकीच्या जीवनात शरीराबरोबरच मनाचेही आरोग्य सांभाळणे गरजेचे बनले आहे. अनेक लोक सध्या डिप्रेशनच्या म्हणजेच नैराश्य किंवा औदासिन्याच्या जाळ्यात अडकत आहेत. त्यामध्येही काहींना 'मॉर्निंग डिप्रेशन'चा त्रास असतो. हे सकाळचे डिप्रेशन म्हणजे नेमके काय असते हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे.

सकाळी झोपेतून उठल्यावर तुम्हाला उदास वाटते का? सकाळची दैनंदिन कामे सुरू करताना तुम्हाला त्रास होतो का? तुम्ही डिमोटिवेट असल्याची भावना होते का? सकाळी कुणी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागले तर तुम्ही चिडता का? जर असे सतत घडत असेल तर हा 'मॉर्निंग डिप्रेशन'चा प्रकार असू शकतो. सकाळी सकाळी डिप्रेशनची लक्षणे दिसत असतील तर त्याला 'मॉर्निंग डिप्रेशन' म्हटले जाते. अर्थात ही काही अधिकृत अशी मानसिक आरोग्याची स्थिती नाही. संशोधनात मॉर्निंग डिप्रेशनला 'ड्युर्नल मूड व्हेरिएशन' असे म्हटले जाते. त्याचा अर्थ माणसाचा मूड प्रत्येक दिवसाच्या हिशेबाने बदलतो. त्यामध्ये बहुतांश लोकांचा मूड सकाळी जास्त खराब असतो आणि दिवस वर येऊ लागेल तसा तो नॉर्मल होतो. काही लोकांचा मूड दिवसभरही खराब राहू शकतो.

ते 'आफ्टरनून स्लम्प फीलिंग'मधून जाऊ शकतात किंवा रात्री अधिकच डिप्रेशन येऊ शकते. तसे पाहता नैराश्य नसलेले लोकही दिवसभर वेगवेगळ्या मनःस्थितीतून जाऊ शकतात. 'मॉर्निंग डिप्रेशन'ची ही काही लक्षणे आहेतः रितेपणा जाणवणे, आहारात बदल, सकाळी उठण्याची आणि बिछाना सोडण्याची अनिच्छा, दिवसाच्या प्रारंभी ऊर्जावान नसल्यासारखे वाटणे, 'हायपरसोम्निया' किंवा जास्त झोपणे, अतिशय जास्त प्रमाणात फ्रस्ट्रेशन, अशांती, आंघोळ करणे किंवा कॉफी बनवण्यासारखी कामेही नको वाटणे…आदी. रांचीच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सायकेट्रिकचे सहायक प्राध्यापक डॉ. वरुण मेहता यांनी सांगितले की मॉर्निंग डिप्रेशनला टेक्निकल टर्ममध्ये 'टिपिकल डिप्रेशन'ही म्हटले जाते.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थच्या 2013 मधील एका अभ्यासानुसार ज्यांचे 'सर्केडियन रिदम' खराब असते त्यांना असा त्रास होऊ शकतो. 'सर्केडियन रिदम' हे आपल्या शरीरात चोवीस तास सुरू राहणारे जैविक घड्याळ आहे. तेच आपल्या झोपण्याच्या व उठण्याच्या चक्राला नियंत्रित करते. कधी कधी मेंदूतील सूज किंवा मेंदूत स्रवणारे तणावाचे कार्टिसोल हार्मोनही त्याच्या बिघडण्याचे कारण बनते. असा त्रास असलेल्या लोकांनी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. चांगली झोप घ्यावी, टॉक किंवा लाईट थेरेपी घ्यावी, शारीरिक व्यायाम करावा, रात्री लवकर झोपावे आणि सकाळी वेळेत उठावे, आहारात हलके अन्न घ्यावे, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT