Jitendra Awhad:  
Latest

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांची गद्दारीची व्याख्या काय ? : आनंद परांजपे

अनुराधा कोरवी

ठाणे : पुढारी वृत्तसेवा :  शरद पवारांच्या सहमतीने एखादा निर्णय झाला की तो साहेबांचा आशीर्वाद पण अजितदादांनी वेगळी भूमिका घेतली की ती गद्दारी? डॉ. जितेंद्र आव्हाड यांची गद्दारीची नक्की व्याख्या काय? ज्या शिवसेनेचा प्रखर विरोध आव्हाड यांनी केला त्याच शिवसेनेचे गोडवे सध्या ते गात असतात. याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे! लोकशाही मार्गाने केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष दिला, चिन्ह दिले ! जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) तुमचे पक्ष कार्यालय ताब्यात घेण्याचा कुठलाही विचार झालेला नाही, असे मत प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले.

संबंधित बातम्या 

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र विधिमंडळातून प्रतिक्रिया देताना म्हटले की, शरद पवार यांच्याशी आम्ही गद्दारी केली. आम्ही त्यांचा पक्ष हिसकावून घेतला, चिन्ह हिसकावून घेतले, कार्यालय देखील आम्ही घुसून ताब्यात घेणार आहोत. माझा त्यांना सरळ प्रश्न आहे की पवारसाहेबांच्या आशीर्वादाने, सहमतीने 2014 साली विधानसभा निवडणुकीची आकडेवारी येत असताना आम्ही बिनशर्त पाठिंबा भाजपला दिला होता याला काय म्हणायचे? 2016 साली, 2018 साली, 2019 साली अनेक बैठका भाजपच्या शीर्ष नेत्यांबरोबर झालेल्या आहेत. साहेबांच्या सहमतीने व आशीर्वादाने या बैठका झाल्या होत्या, याला काय म्हणायचे? ज्या आव्हाड यांनी स्वतः सामना पेपर जाळला.

शिवसेनेविरूद्ध आंदोलने केली त्याच शिवसेनेचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीच्या सत्तेत 2019 मध्ये सामील झाले मग याला काय म्हणायचे? म्हणजे पवारांच्या सहमतीने एखादा निर्णय झाला की तो साहेबांचा आशीर्वाद पण 2 जुलै 2023 रोजी, एक वेगळी राजकीय भूमिका आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली की ती गद्दारी? आव्हाड यांची गद्दारीची नक्की व्याख्या काय? याचे आत्मपरीक्षण त्यांनी स्वतः करावे, अशी प्रश्नांची सरबत्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आव्हाड यांच्यावर केली आहे. ( Jitendra Awhad )

कार्यालय ताब्यात घेण्याचा विचार नाही

2 जुलैला आम्ही शपथ घेतली, त्यावेळी रात्री 2 वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे अपत्रातेची पिटीशन आपण टाकलीत. निवडणूक आयोगासमोर दोन-तीन महिने सुनावणी झाली. त्याच्यानंतर पक्ष व चिन्ह याचा निर्णय आमच्या बाजूने मिळाला, लोकशाही मार्गाने केंद्रीय निवडणूक आयोगाने आम्हाला पक्ष दिला, चिन्ह दिले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमच्या बाजूने निर्णय दिला आणि आमचे कुठलेही 41 आमदार अपात्र झालेले नाहीत.

यामुळे उगाचच वाजवा तुतारी ! ही तुतारी पुन्हा रायगड ला जाऊन वाजवा आणि आमच्यामध्ये तुमचे कार्यालय ताब्यात घेण्याचा कुठलाही विचार झालेला नाही. ते कार्यालय तुम्हाला शासनाने दिलेले आहे. आम्हालाही आमचे कार्यालय शासनाने दिलेले आहे आणि आमच्या पक्षाचे कामकाज उत्कृष्टरित्या प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे, असे शेवटी प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT