Latest

गाय, वासरू आणि डीएनए

Shambhuraj Pachindre

डीएनए टेस्ट म्हणजे काय आहे, हे माहीत आहे का रे भाऊ तुला? म्हणजे बघ, एखाद्या धनाढ्य व्यक्तीचे वारसदार म्हणून खूप लोक त्याच्या मृत्यूनंतर उभे राहतात. त्यांची बरेचदा डीएनए टेस्ट करावी लागते; पण नुकतीच एक बातमी माझ्या वाचण्यात आली की, डीएनए टेस्टमुळे गाय-वासरांची पुन्हा भेट घडवून आणण्यात आली.

होय रे मित्रा, मीही ती बातमी वाचली होती. राजस्थानमध्ये एका शेतकर्‍याच्या गायीला वासरू झाले आणि दुसर्‍या एका शेतकर्‍याने दादागिरी करून ते वासरू पळवून नेले आणि तो ते वासरू आपलेच आहे असे सांगू लागला. प्रकरण पोलिस ठाण्यामध्ये गेले. तब्बल 18 महिने तपास करून शेवटी पोलिसांनी गायीची आणि वासराची डीएनए टेस्ट केली. यामध्ये ते वासरू तक्रारदार शेतकर्‍याच्या गायीचेच आहे, असे सिद्ध झाले आणि सुमारे 18 महिन्यांनी त्या मातेला न्याय मिळाला. 70 वर्षे वयाचा शेतकरी ज्याचे वासरू पळवून नेण्यात आले होते, त्याला पण न्याय मिळाला. ही डीएनए टेस्ट म्हणजे गाय आणि वासरू यांच्या जनुकांचा अभ्यास करून त्या दोन जीवांचे नाते काय आहे, हे निश्चित करते.

माणसांमध्ये ही बरेचदा करावी लागते; पण प्राण्यांमध्ये अशी काही टेस्ट करण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी.

माझ्या माहितीप्रमाणे नवजात बालकांसारखा वासरांमध्ये आणि गायीमध्ये असा काही प्रकार नसतो. तू एखाद्या डेअरी फार्मवर जाऊन पाहा. निसर्गाचा एक उत्कट आविष्कार तुला पाहायला मिळेल. म्हणजे होते काय की, तिथे शंभर एक गायी असतात. त्यापैकी विलेल्या गायींची आणि आईचे दूध पिणारी 30-40 वासरे असतात. त्या गाई चरायला सकाळी बाहेर जातात आणि संध्याकाळी परत येतात. गाय गोठ्याकडे परत येते, तीच हंबरत येते आणि त्याचवेळी आपली आई जवळ आली आहे, याची जाणीव झाल्यामुळे वासरे पण ओरडायला लागतात. गायी आल्याबरोबर त्यांना गोठ्यामध्ये बांधले जाते आणि त्यानंतर त्या सर्व वासरांना आईचे दूध पिण्यासाठी मोकळे सोडले जाते. वासरे गाई बांधलेल्या गोठ्याकडे जातात आणि न चुकता ते आपापल्या आईकडेच जाऊन दूध प्यायला सुरुवात करतात. रंग, रूप कशाचेही ज्ञान न झालेली वासरे बिनचूक आपल्या आईला ओळखतात आणि तिचेच दूध पितात. गाय आणि वासरांना एकमेकांची ओळख पटविण्यासाठी कुठल्याही डीएनए टेस्टची गरज नसते.

पण, ही जी राजस्थानमध्ये घडलेली घटना आहे, यातील त्या तक्रार करणार्‍या 70 वर्षीय पशुपालकाचे मला फार कौतुक वाटते. आपल्या गायीला तिचे वासरू मिळवून देण्यासाठी तब्बल दीड वर्ष त्यांनी पाठपुरावा केला. त्याचबरोबर पोलिसांचेही कौतुक यासाठी की, त्यांनी अनुवंशशास्त्राचा वापर करून म्हणजेच डीएनए टेस्ट करून गाय आणि वासरू यांची भेट घडवून आणली. प्रकरण मुळात दादागिरीमुळे घडले. हिंदीमध्ये एक म्हण आहे 'जिसकी लाठी उसकी भैन्स.' इथे कोणीतरी लाठीकाठीच्या जोरावर त्या वासरावर कब्जा करू पाहत होते; पण मूळ मालक असलेल्या शेतकर्‍याने हा प्रयत्न आणून पडला. शास्त्र फक्त माणसाच्याच उपयोगी पडते असे नाही, ते प्राण्यांसाठी पण उपयुक्त असते.

– झटका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT