पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने 21 जुलैपासून गाय दुधाचा खरेदी दर प्रति लिटरला 34 रुपये निश्चित केला असून, सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांनी शेतकऱ्यांना विनाकपात दूध देण्याच्या शासनाच्या निर्णयाचे शेतक-यांकडून स्वागत करण्यात येत असून, घोषित दूध दर न दिल्यास शासन कोणती कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 22 जून रोजी पुण्यात दूध दर घसरणीच्या विषयावर सहकारी व खासगी डेअरी प्रतिनिधीची बैठक घेतली होती.
समितीने शिफारस केल्यानुसार गायीच्या 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ या गुणप्रतिच्या दुधाचा खरेदी दर प्रति लिटरला 34 रुपये निश्चित करण्यात येऊन शासन आदेश जारी करण्यात आला आहे. राज्य सरकारने यापूर्वीही असे निर्णय घेतलेले असून, काही खासगी दूध प्रकल्पांनी निर्णयाची अंमलबजावणी केली नसल्याने शेतकर्यांचे नुकसान झाले होते. त्यामुळे आदेशाचे पालन न केल्यास शासन कोणती कारवाई करणार? असा प्रश्न दूध उत्पादक शेतक-यांकडून उपस्थित केला जात आहे.
शासनाने पाच रुपये अनुदान द्यावे !
कात्रज दूध संघाकडून गायीच्या दूध खरेदीस 34 रुपये दर दिला जाईल. शेतकर्यांसाठी हा निर्णय निश्चितच चांगला आहे. पूर्वानुभव पाहता खरेदी दरवाढीमुळे सहकारी संघाकडे दुधाची आवक वाढून आर्थिक अडचणी वाढतात. त्यामुळे शासनाने कर्नाटकप्रमाणे गायीच्या दूध खरेदीपोटी शेतक-यांच्या बँक खात्यावर प्रति लिटरला पाच रुपये अनुदान द्यावे, अशी आमची मागणी आहे.
– भगवान पासलकर, अध्यक्ष, कात्रज दूध संघ, पुणे.
दूध भेसळ बंद केल्यास 44 रुपये दर
गायीच्या दुधाला प्रति लिटरला 34 रुपयांचा घोषित दर दूध संस्थांनी न दिल्लास शासन काय करणार ? हा प्रश्न आहे. आजपर्यंत दूध भेसळखोरीवर किती कारवाया झाल्या ? भेसळीच्या दुधामुळे दूध वितरणाचा आकडा फुगलेला दिसतो. कायद्याने भेसळखोरांवर कडक कारवाई करून कायमचा बंदोबस्त करण्याची खरी आवश्यकता आहे. तसे झाल्यास गायीच्या दुधाला लिटरला 34 रुपये नाही तर 44 रुपये दर आपोआपच मिळेल, याची खात्री आहे.
– रघुनाथदादा पाटील, प्रदेशाध्यक्ष, शेतकरी संघटना.
आदेशांच्या अंमलबजावणीसाठी सतर्क राहा
गायीच्या दुधाचा खरेदी दर प्रतिलिटरला 34 रुपये करण्याचा निर्णय स्वागतार्ह असून, अखिल भारतीय किसान सभेच्या आंदोलनाचा तो विजय आहे. शासनाच्या निर्णयांच्या अंमलबजावणीबाबतचा पूर्वानुभव पाहता खासगी दूध डे-या आदेश पाळत नाहीत. त्यामुळे दूध दराच्या शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी सतर्कता बाळगून
शेतक-यांना न्याय द्यावा.
– अजित नवले, सरचिटणीस, अखिल भारतीय किसान सभा.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.