पुढारी ऑनलाईन : गेल्या आठवड्यापासून भारतातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. यानंतर पुन्हा एकदा उत्तर-पश्चिम भागात वादळी पाऊस, वारा आणि गारपीटीची शक्यता IMD दिल्लीने वर्तवली आहे.
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे भारतील अनेक राज्यांना अवकाळीचा फटका बसत आहे. येत्या 2 दिवसांत, पश्चिम हिमालय क्षेत्रासह संपूर्ण उत्तर-पश्चिम भारतात पाऊस, वादळ आणि गारपिटीची शक्यता आहे. ३१ मार्चपर्यंत हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पूर्व-पश्चिम राजस्थान आणि उत्तर प्रदेशात गारपीट होणार आहे, असे हवामान खात्याने सांगितले आहे.
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर वायव्य, पूर्व आणि दक्षिण भारतातील काही भागांवर याचा परिणाम होत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील हवामान बदलाचा परिणाम जाणवत आहे. दरम्यान गुजरात, दक्षिण भारताची किनारपट्टी आणि विदर्भात यलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान या भागातील तापमानात किंचितशी वाढ होणार आहे. तसेच ३० ते ३१ मार्च दरम्यान विदर्भातील काही जिल्ह्यांना गारपीट आणि गडगडाटांसह हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये विदर्भातील नागपूर, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश असल्याचे भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे.